कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२५ वे वर्ष ; कार्यकारी विश्वस्तपदी अॅड.शिवराज कदम जहागिरदार
पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी २०२२-२३ या मंदिराच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाकरीता अॅड.प्रताप परदेशी यांची निवड झाली. तर कार्यकारी विश्वस्तपदी अॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदारपदी महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे आणि उप उत्सवप्रमुख म्हणून युवराज गाडवे यांची नियुक्ती झाली आहे.
यासोबतच सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई हे विश्वस्तपदी असणार आहेत. ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी हे ज्येष्ठ विधीज्ञ असून पुणे बार असोसिएशनवर त्यांनी काम केले आहे. तसेच दत्तमंदिर ट्रस्टसह श्री महालक्ष्मी मंदिरावर देखील ते अनेक वर्षे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी काम केले आहे. अॅड.शिवराज कदम जहागिरदार हे विधीज्ञ असून मागील दत्तमंदिर ट्रस्टच्या पंचवार्षिक कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष देखील म्हणून कार्यरत होते. तसेच पुणे बार असोसिएशनसह पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व विविध धार्मिक, सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत.
अॅड. प्रताप परदेशी, अॅड.शिवराज कदम-जहागिरदार, युवराज गाडवे यांनी यापूर्वी दत्तमंदिर ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तर, महेंद्र पिसाळ हे पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. यंदाचे मंदिराचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असून वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम होणार आहेत. तसेच न्यासाकडे असलेल्या निधीचा विनियोग सामाजिक कार्याकरिता करणार असल्याचा निर्धार नवनियुक्त अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी यांसह नवनियुक्त विश्वस्त मंडळाने केला आहे.

