पुणे-शहरात दूध व दुग्धजन्य पदार्थात विशेषतः गावरान तुपात , तेल आणि डालड्याची भेसळ करून शहरातील नामांकित दूध डेअरींना विक्री करणा-या रॅकेटचा पर्दाफाशकरण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन व गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून कोंढव्यातून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी जवळपास 15 लाख रुपये किमतीचे भेसळ करण्यासाठी वापरलेले साहित्य व तूप जप्त करण्यात आले.शेरसिंह रणसिंह राजपूत (वय 28) केशरसिंह शुगसिंह राजपूत (वय 28) गंगासिंह राजपूत (वय 25), अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेला कोंढवा येथील गोकुळनगर परिसरात गल्ली क्रमांक तीनमध्ये एका इमारतीत गावरान तुपात भेसळ करून शहरातील डेअरींमार्फत त्याची विक्री केली जात आहे, अशी माहिती खब-यांकडून समजली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांसमवेत गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने गोकुळनगरमधील इमारतीवर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला.या कारवाईत 15 लाख रुपये किमतीचे तूप व भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची पोलीस चौकशी सुरू होती. या ठिकाणाहून भेसळ केलेले तूप गावरान म्हणून शहरातील नामांकित डेअरींना विकले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली