बारामती- फेरेरो इंडिया या कंपनीतर्फे ‘किंडर स्पोर्ट’ हे मुलांसाठीचे शिबिर बारामती येथे सुरू झाले. या शिबिराचे उदघाटन ‘एन्व्हार्यमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या संस्थापिका सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी फेरेरो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक स्टेफानो पेले, फेरेरो इंडियाचे सेक्रेटरी जनरल व राजदूत इंदर चोप्रा, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
2 जून ते 6 जून या काळात चालणाऱ्या या शिबिरात मुलांना विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी संधी मिळेल. तसेच या खेळांमधून मिळणाऱ्या आरोग्याची माहिती त्यांना देण्यात येईल. फेरेरो या कंपनीच्या जागतिक स्तरावरील सामाजिक उपक्रमांचा हा भाग आहे. यंदा बारामतीतील विविध शाळांमधील 5 ते 12 वयोगटाच्या 400हून अधिक मुलांना या शिबिरात संधी मिळणार आहे. त्यांचे खेळ घेण्यासाठी 20 प्रशिक्षक येथे उपस्थित असतील. या प्रशिक्षकांना इटली या देशात ‘किंडर स्पोर्ट’चे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबविण्याकरीता ‘किंडर स्पोर्ट’मध्ये यंदा ‘जॉय ऑफ मुव्हिंग’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. इटलीतील रोम विद्यापीठ, फोरो इटालिको, पेडमॉन्ट भागातील क्रीडा प्रशासन आणि इटालियन ऑलिम्पिक समिती यांच्या सहकार्याने ‘जॉय ऑफ मुव्हिंग’ संकल्पना तयार करण्यात आली आहे.
बारामतीतील शिबिरात 400 मुलांचे 5-6, 7-8. 9-10 व 11-12 वर्षे असे चार वयोगट निर्माण करण्यात येतील. त्या-त्या वयातील मुलांच्या शारिरीक, मानसिक गरजा वेगवेगळ्या असतात हे या ठिकाणी लक्षात घेतले जाईल. फूटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, अथलेटिक्स हे खेळ त्यांच्यासाठी आयोजिक केले जातील.
या शिबिराच्या आयोजनाबद्दल बोलताना ‘फेरेरो इंडिया’चे सेक्रेटरी जनरल इंदर चोप्रा म्हणाले, की किंडर स्पोर्ट हे चौथे शिबिर बारामतीमध्ये घेताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम पुण्याशेजारच्या शहरांमध्येही नेण्याचा आमचा हा उद्देश आहे.
भारतात किंडर स्पोर्ट हा उपक्रम 2014 मध्ये बारामतीमध्येच सुरू झाला. गेल्या वर्षीदेखील या शिबिरात चारशे मुले सहभागी झाली होती. ‘किंडर स्पोर्ट’ला जगभरातील ऑलिंपिक समित्या, सरकारी संस्था, क्रीडा संघटना व महासंघ यांचे सहकार्य लाभलेले आहे. शालेय विद्यार्थी व तरुण वर्य यांच्याशी संपर्क साधण्याची या सर्व संस्थांची सामायिक उद्दीष्टे ‘किंडर स्पोर्ट’मधून सफल होतात.
किंडर स्पोर्ट जागतिक स्तरावर..
‘किंडर स्पोर्ट – जॉय ऑफ मुव्हिंग’ हा फेरेरो समुहाचा सामाजिक बांधिलकी संदर्भातील आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा प्रकल्प आहे. मैदानी खेळांतून मिळणारा आनंद प्रत्येक मुलाला मिळावा, हा या प्रकल्पाचा हेतू आहे.
तरूण पिढीमध्ये मैदानी खेळ व प्रत्यक्ष शारिरीक हालचाली यांविषयी आवड निर्माण व्हावी व पुढील आयुष्यात या पिढीने खेळ ही आपल्या दिनचर्येची आवश्यक बाब मानावी, यासाठी तिला या ‘किंडर स्पोर्ट’मधून उत्तेजन दिले जाते. अधिकाधिक देशांमध्ये या प्रकल्पाचा प्रसार व्हावा, अशी महत्वाकांक्षा बाळगून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठीच या क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञ व त्यांच्या संस्था, 4 ऑलिंपिक समित्या, 126 क्रीडा महासंघ व संघटना, तसेच आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघ (आयएसएफ) यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळांना उपकरणे व साहित्य पुरवणे, शारिरीक शिक्षणासाठी त्यांना मदत करणे, विद्याथ्यार्ना चॅम्पियन बनण्यासाठी उत्तेजन देणे, लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा तसेच क्रीडा शिबिरे आयोजित करणे, जगभरातील नामवंत खेळाडू व अथलेट यांच्या सहकार्याने त्यांना चैतन्ययुक्त जीवनशैलीच्या संकल्पनेचे अॅम्बेसिडर म्हणून सादर करणे आणि जगातील अशाच इतर काही प्रकल्पांना मदत करणे, अशी या किंडर स्पोर्ट संकल्पनेची व्याप्ती आहे.
2005मध्ये ही संकल्पना प्रथम राबविण्यात आली. तेव्हापासून हा प्रकल्प वाढत असून जगभरातील अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट गाठले जात आहे. सध्या 28 देशांमधील 44 लाख मुलांनी किंडर स्पोर्टचा आनंद घेतलेला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर 3200 कार्यक्रम ‘किंडर स्पोर्ट’ने आतापर्यंत आयोजित केले आहेत…
– व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, सॉकर, अॅथलेटिक्स, जलतरण, फेन्सिंग, स्कीईंग, वॉटर पोलो, नौकानयन, हॅन्डबॉल, डॉजबॉल, बॅडमिंटन अशा विविध खेळांचे आयोजन,
– 1443 अॅथलेट्स, चॅम्पियन्स व माजी चॅम्पियन्स यांचा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग,
– चार ऑलिंपिक समित्या व 126 क्रीडा महासंघ व संघटना यांचा सहभाग,
– आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघ (आयएसएफ) यांच्यामार्फत जगभरातील 4 कोटी मुलांना खेळांचा आनंद.