पुणे-: टाटा पॉवर ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी आपल्या कार्यक्षेत्रात व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या तरुणांच्या सर्वंकष विकासाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिली आहे. या अनुषंगाने, टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने (टीपीसीडीटी) ग्रामीण भागातील तरुणांची कौशल्य वाढवण्यासाठी व त्यांना जवळ्या उद्योगांमध्ये व बाजारात रोजगार मिळण्यासाठी मावळ व भिवपुरी येथे एम्प्लॉएबिलिटी – कौशल विकास प्रोग्रॅम सुरू केला आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून तीन वर्षांमध्ये, या कार्यक्रमाने 1,170 तरुणांना व्होकेशनल व सेवा उद्योग कौशल्यांमध्ये प्रशिक्षित व प्रमाणित केले आहे.
बहुतांश तरुण दैनंदिन रोजगारावर मजुरी करत असल्याने त्यांना काम करता करता शिकण्याची संधी देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. मोड्युलर एम्प्लॉएबल स्किल्स ट्रेनिंग प्रोग्रॅम याअंतर्गत टीपीसीडीटीने या तरुणांना अभ्यासक्रमाला अनुसरून तज्ज्ञ शिक्षकांकडून किमान 300 – 750 तासांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण व पुस्तकी ज्ञान दिले.
उपलब्धतेच्या दृष्टीने, ग्रामीण भागातील तलावांच्या पाणलोट क्षेत्रात व प्रकल्पाच्या जवळच्या क्षेत्रात पाच ग्रामीण एम्प्लॉएबिलिटी सेंटर सुरू करण्यात आली. ही केंद्रे ‘कौशल विकास योजना’ योजनेंतर्गत, परिसरातील तरुणांना रोजगार मिळवण्यास व स्वावलंबी होण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षित करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आली. प्रशिक्षण देण्यात आलेल्या 70% युवकांना केएसपीजी इंजिनीअरिंग, महिंद्रा अँड महिंद्रा, टीव्हीएस कंपनी, इंटेल इलेक्ट्रॉनिक्स, कामशेत व लोणावळा परिसर, अमेझॉन बॅक एंड ऑफिस; कर्जत व खोपोली परिसरातील इमॅजिका, पाइनवुड रिसॉर्ट येथे प्लेसमेंट मिळाली असून त्यांचे मासिक वेतन 6000 रुपये ते 18000 रुपये आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना, टाटा पॉवरचे सीओओ व कार्यकारी संचालक अशोक सेठी यांनी सांगितले, “आम्ही टाटा पॉवरमध्ये नेहमी तरुणांसाठी विकास कार्यक्रमावर विशेष भर दिला आहे. कौशल विकास योजनेच्या अंतर्गत एम्प्लॉएबिलिटी सेंटर स्थापन करून आम्ही समाजाप्रती असलेली आमची बांधिलकी अधोरेखित केली आहे. या विकासाच्या कार्यक्रमाने या परिसरातील 1,170 तरुणांना लाभ झाला आहे व त्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, तसेच भविष्यात अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो जणांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. अशा उपक्रमांद्वारे त्यांचे जीवन सुधारण्यासाठी व प्रगतीच्या दिशेने समाज करत असलेल्या वाटचालीमध्ये योगदान देण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करणार आहोत.”
या कार्यक्रमाच्या अंतर्गत, मावळ व भिवपुरी परिसरातील तरुणांना इलेक्ट्रिकल वायरमन, डोमेस्टिक होम अप्लायन्सेस, हेल्थ असिस्टंट, हॉटेल मॅनेजमेंट, मायक्रो ऑफिस स्पेशालिस्ट, सीएनसी मशीन ऑपरेटर, ब्युटी पार्लर तज्ज्ञ, फायनान्शिअल अकाउंटिंग अशा ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, महाराष्ट्र टिळक विद्यापीठ, आयसीई, नवी मुंबई, सीआयटी अशा मान्यताप्राप्त संस्था/ व्यवसायिक मंडळाकडून प्रमाणपत्रे दिली आहेत.