या सहयोगाच्या माध्यमातून सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ग्राहकांना गृहकर्ज उत्पादनांची विस्तृत मालिका उपलब्ध होणार
मुंबई: टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेड या टाटा कॅपिटल लिमिटेडच्या पूर्णपणे मालकीच्या उपकंपनीने सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या १०० वर्षे जुन्या आघाडीच्या बँकिंग कंपनीशी योजनाबद्ध सहयोग केला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेडची (टीसीएचएफएल) विस्तृत उत्पादन मालिका उपलब्ध होईल.
सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही भारतातील सर्वांत मोठी सहकारी बँक असून, भारतभरात बँकेच्या २८१ शाखा आहेत. या भागीदारीमुळे टीसीएचएफएलला आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याची तसेच देशातील दुर्गम भौगोलिक प्रदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. टीसीएचएफएलच्या उत्पादनश्रेणीमध्ये गृहकर्जे, परवडण्याजोगी गृहनिर्माण (हाउसिंग) कर्जे आणि मालमत्ता तारण ठेवून दिली जाणारी कर्जे यांचा समावेश होतो.
टीसीएचएफएलच्या गृहकर्जांच्या मदतीने ग्राहक खूप काही करू शकतात, उदाहरणार्थ, बांधकामासाठी भूखंड विकत घेणे किंवा घराचा विस्तार करणे आदी. नव्याने सुरू झालेले एसेल होम लोन कर्जाच्या सुरुवातीच्या काळातील हप्ता कमी ठेवून आर्थिक ओढाताण होणार नाही याची काळजी घेते आणि ग्राहकाचे उत्पन्न वाढते, तसे हळूहळू कर्जाचे हप्तेही वाढत जातात. याबरोबरच फ्लेक्झी (लवचिक) गृहकर्जाचे पर्यायही जलद व सुलभ मंजुरीसह उपलब्ध आहेत.
या सहयोगाबद्दल टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कौल म्हणाले, “देशभरातील ३० लाख वैविध्यपूर्ण ग्राहकांना सेवा देण्याचे १००वे वर्ष पूर्ण केलेल्या सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. घर खरेदी करू इच्छिणाऱ्या तसेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना आमची कल्पक मॉर्गेज उत्पादने देऊ करण्याची संधी यामुळे आम्हाला मिळणार आहे. जलद नागरीकरण, रेरासारखी पारदर्शक धोरणे तसेच २०२२ सालापर्यंत सर्वांसाठी घरे या सरकारच्या दृष्टिकोनामुळे गृहनिर्माण वित्तसहाय्याला सध्या चालना मिळत आहे.”
सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्ष गौतम ई. ठाकूर म्हणाले, “ग्राहकांकडून होणारी गृहकर्जाची वाढती मागणी पूर्ण करण्यात टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्ससोबत झालेला करार उपयुक्त ठरेल. यूसीबींना (शहरी सहकारी बँका) अस्तित्वात असलेली सारासार एक्स्पोजर मर्यादा लक्षात घेऊन निवासी एककाच्या (घराच्या) प्रत्येक लाभार्थीमागे ७० लाख रुपयांपर्यंत व्यक्तिगत गृहकर्ज देण्याची परवानगी आहे. त्यामुळे ७० लाखांहून अधिक गृहकर्जाची आवश्यकता व ग्राहक बँकेच्या कर्ज मंजुरी मर्यादेच्या पलीकडे जातात. अशा ग्राहकांना टीसीएचएफएलमार्फत गृहकर्जे मिळवून देता येतील.
टीसीएचएफएल आणि सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मिळून आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यासाठी भक्कम वारसा, विश्वास तसेच वचनबद्धतेचा मिलाफ साधू शकतात. दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर ठरू शकेल असा हा प्रवास टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेडसोबत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ”
सारस्वत बँकेच्या ग्राहकांना अखंडित गृहकर्ज अनुभव मिळवून देण्याचे उद्दिष्ट टीसीएचएफएलपुढे आहे. डिजिटायझेशनुळे कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व कमीत-कमी कागदपत्रांमध्ये होतात. ग्राहक सुलभतेने त्यांना सर्वांत अनुकूल ठरेल असे गृहकर्ज उत्पादन निवडू शकतात.
टाटा कॅपिटल लिमिटेड विषयी
टाटा कॅपिटल लिमिटेड ही एक सर्वांगीण आर्थिक सेवा पुरवठादार कंपनी असून रिटेल, कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता थेट किंवा आपल्या उपकंपन्यांच्या माध्यमातून करते. कंपनीच्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये ग्राहक वित्तसहाय्य, सल्लागार सेवा, व्यावसायिक वित्तसहाय्य, पायाभूत सुविधांसाठी वित्तसहाय्य, सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, खासगी शेअर सल्ला, क्रेडिट कार्ड्स आणि ट्रॅव्हल व फोरेक्स सेवा आदींचा समावेश होतो.