शांघाय – टाटा टेक्नोलॉजीज ही जागतिक स्तरावर इंजिनीअरिंग सेवा देणारी कंपनी, इलेक्ट्रॉनिक वाहन श्रेणी विकसित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत, अतिप्रगत इलेक्ट्रॉनिक कार्सचे उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी एनआयओ चीनसोबत काम करणार आहे. टाटा टेक्नोलॉजीजने या संबंधाची घोषणा आज केली. या दोन कंपन्यांमधील सहयोग सुरू झाला तो एनआयओच्या पहिल्या पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून तयार झालेल्या ईएस-एट या वाहनासाठी इंजिनीअरिंग विकसित केले तेव्हापासून. ईएस-एट हे चीनच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आणलेले आपले पहिले उत्पादन असावे, हा एनआयओचा उद्देश आहे.
या संबंधाबद्दल टाटा टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वॉरन हॅरिस म्हणाले, “ईएस-एट हा वाहन उद्योगातील महत्त्वाचा टप्पा आहे. सात आसनांचे हे उच्च कामगिरी करणारे एसयूव्ही म्हणजे चाकांवरील घरच आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण उत्पादनासाठी एनआयओसोबत काम करता आले हा टाटा टेक्नोलॉजीजसाठी मोठा सन्मान आहे. लाइटवेटिंग (कमी वजनाची वाहने तयार करणे), कनेक्टेड (परस्परपूरक) वाहने आणि उत्पादनाच्या जीवनचक्राचे व्यवस्थापन (पीएलएम) या क्षेत्रात एनआयओसोबत आम्ही बारकाईने केलेले काम हे भविष्यकाळात वाहतूक परिसंस्था निश्चित करणाऱ्या भागीदारी कशा असाव्यात याचे उत्तम उदाहरण आहे. शिवाय, आमच्या चीन, भारत, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेतील कार्यात्मक आस्थापनांच्या माध्यमातून आम्ही एनआयओला सेवा देऊ शकत आहोत, ही जागतिक स्तरावर आस्थापने विकसित करण्यासाठी आम्ही केलेल्या गुंतवणुकीला मिळालेली पोचपावती आहे. एनआयओसोबत आणखी मोठ्या प्रमाणात भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
एनआयओच्या वाहन इंजिनीअरिंग विभागाचे उपाध्यक्ष श्री. रॉजर माल्कसन टाटा टेक्नोलॉजीजच्या योगदानाची दखल घेत म्हणाले, “जागतिक स्तरावर नवीन मापदंड प्रस्थापित करेल असा पहिल्या दर्जाचा अनुभव वापरकर्त्यांना देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आमच्यापुढे आहे आणि हे गाठण्यात आम्हाला मदत करण्यासाठी भागीदार म्हणून टाटा टेक्नोलॉजीजला आमची पसंती आहे. सुरक्षितता आणि सफाई हे दोन्ही निकष सर्वोच्च पातळीवर पूर्ण करणारे एक अंतिम उत्पादन देण्यासाठी त्यांनी चीन, भारत, ग्रेट ब्रिटन आणि रोमानिया येथील आपले तज्ज्ञ आणि पथके एकत्र आणली व एनआयओसोबत काम केले. तयार झालेले पहिले उत्पादन म्हणजे पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून तयार झालेली ईएस-एट ही एसयूव्ही आहे. या वाहनाने कमी वजनाच्या गाड्यांच्या विभागात नवीन मापदंड स्थापन केला असून अगदी कोऱ्या कागदापासून ते चाचणीसाठी सज्ज असलेले वाहन यांच्यातील प्रवासाच्या जागतिक मान्यताप्राप्त वेगाच्या तुलनेत विक्रमी वेगाने हे पूर्ण झाले आहे.”
दोन्ही कंपन्यांनी २०१५ सालच्या मध्यात एकत्र कामाला सुरुवात केली. अतिप्रगत इलेक्ट्रॉनिक वाहने तयार करणारी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी स्टार्ट-अप म्हणून एनआयओची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीतच कंपनीने टाटा टेक्नॉलॉजीजसोबत काम सुरू केले. तेव्हापासून ईएस-एटमधील इंजिनीअरिंगच्या बाजूवर टाटा टेक्नोलॉजीज काम करत आहे. यामध्ये गाडीची रचना, दरवाजे आणि बाह्यरचना, अद्ययावत उत्पादन इंजिनीअरिंग, पीएलएम आणि ऑफ-कार कनेक्टिव्हिटी आदी घटकांवर टाटा टेक्नोलॉजीजने काम केले आहे. एनआयओसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण भागीदारीमध्ये काम करताना टाटा टेक्नॉलॉजीजने आपले जगभर वितरित झालेले कामाचे प्रारूप वापरले आणि चाकोरीबाह्य इंजिनीअरिंग प्रक्रियांमधील आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले.
उद्योगात मापदंड स्थापन करेल अशी उत्पादन विकास प्रक्रिया तयार करण्याच्या उद्देशासह काम करत असताना एनआयओ आणि टाटा टेक्नोलॉजीजने अत्याधुनिक साधनांचा वापर करून गाडीच्या वजनाचा उत्तम वापर करून घेण्यासाठी अनेक संकल्पनांवर काम केले आहे. चीनमध्ये अद्ययावत सामुग्रीवर आधारित वाहनांचा प्रसार करण्यात मूलगामी ठरेल अशी प्रक्रिया तयार करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. या कौशल्याचे उपयोजन केल्याचे फळ म्हणून ईएस-एटने साध्य केलेला वजन व कार्यक्षमतेचा तोल युरोकारबॉडी परिषदेमध्ये आतापर्यंत सर्वोत्तम ठरलेल्या गुणोत्तराहूनही अधिक चांगला आहे.
पीएमएम क्षेत्रातही या भागीदारीमुळे अनेक महत्त्वाचे तंत्रज्ञानात्मक टप्पे गाठले गेले आहेत. टीमने 3DEXPERIENCE ® 2016x (Dassault Systèmes) ही सुविधा यशस्वीरित्या अमलात आणली आहे. टाटा टेक्नोलॉजीजच्या जागतिक स्तरावरील प्रतिभावंतांनी हे प्रत्यक्षात आणले असून अतिप्रगत इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या मूळ उपकरण उत्पादनाच्या (ओईएम) क्षेत्रातही अशाच प्रकारचे यश प्राप्त केले आहे. यामुळे उत्पादन विकासाच्या जीवनचक्राला सहकालिक (कॉन्करण्ट) इंजिनीअरिंगच्या माध्यमातून वेग देणे इंजिनीअर्सना शक्य होत आहे.
इलेक्ट्रॉनिक वाहने आणि त्याला जोडलेले कार उद्योग आता बुद्धिमत्तेवर आधारित वाहतुकीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. अंगभूत इन्फोटेनमेंट प्रणाली, बुद्धिमत्तेवर आधारित वाहतूक आदी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य झालेल्या घटकांना असलेली मागणी जागतिक स्तरावर वाढत आहे. स्मार्टकार्सच्या विकासासाठी तसेच उत्पादनासाठी दक्षिण व पूर्व आशियातील बाजारपेठा सर्वोत्तम समजल्या जात आहेत.
टाटा टेक्नोलॉजीजविषयी:
जगातील अग्रगण्य उत्पादकांसाठी भविष्यकालीन उत्पादनांची रचना, इंजिनीयरिंग आणि पडताळणी करून देऊन टाटा टेक्नोलॉजीज उत्पादन विकासातील स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे काम करते. ८५०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जगभरातील ग्राहकांना सेवा पुरवणारी टाटा टेक्नोलॉजीज ही अतिप्रगत इंजिनीअरिंग, संशोधन व विकास, उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन सल्ला व सॉफ्टवेअर आणि संलग्न आयटी उपाययोजना पुरवणारी उत्पादन क्षेत्रातील भागीदार कंपनी आहे.