औद्योगिक उत्कृष्टतेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
पुणे-: द इन्फोसिस पुणे डेव्हलपमेंट सेंटर (डीसी) यांना मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत मानाच्या ‘महाउद्योगरत्न पुरस्कारा‘ने गौरवण्यात आले. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. इन्फोसिसला महाराष्ट्रातील ‘बेस्ट आयटी सॉफ्टवेअर कंपनी‘ (इन्फोसिस लिमिटेड) आणि ‘बेस्ट आयटी एनेबल्ड कंपनी‘ (इन्फोसिस बीपीएम) हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
व्यवसायवृद्धी आणि राज्याच्या महसुलातील वाढीसाठी सातत्याने केले जाणारे प्रयत्न आणि त्यातील सहभाग तसेच कुशल आणि अकुशल क्षेत्रात सर्वाधिक संख्येने रोजगारनिर्मिती यासाठी इन्फोसिसला हे पुरस्कार देण्यात आले आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतील इन्फोसिसच्या सहभागाबद्दलही त्यांचे कौतुक करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई, पर्यटनमंत्री श्री. जयकुमार रावळ आणि गृहराज्यमंत्री श्री. प्रविण पोटे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कंपनीच्या समभागधारकांना योग्य मूल्य मिळावे यासाठी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल या पुरस्कारामुळे घेतली गेली आहे.