पुणे–भारतात व्यवसाय वाढ करण्याच्या आपल्या आश्वासनाची पूर्तता करीत यूबीएस कंपनीने पुण्यात आपले दुसरे कार्यालय सुरू केले आहे. ‘यूबीएस’चे हे भारतातील चौथे कार्यालय आहे. नवे कार्यालय ‘इऑन आयटी पार्क’ येथे प्रशस्त जागेत व आधुनिक वातावरणात सुरू झाले आहे. कंपनीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि आणि व्यावसाय प्रक्रियेचा विकास करण्याचे काम या ठिकाणी होणार आहे.
भारतात दीर्घ काळासाठी व्यवसाय करण्याचे ‘यूबीएस’चे उद्दीष्ट आहे. 2017 ते 2019 या काळात येथील कर्मचाऱ्यांची संख्या 211 टक्क्यांनी वाढविण्याचे कंपनीचे नियोजन आहे. या सप्टेंबरमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांची भारतातील संख्या 3 हजारांहून अधिक झाली आहे, असे ‘यूबीएस’चे भारतातील प्रमुख हेरॉल्ड एगर म्हणाले.
‘यूबीएस’चे पुण्यात पहिले कार्यालय 2015 मध्ये येरवडा येथे सुरू झाले. कंपनीच्या जगभरातील कामकाजाचा आढावा येथून नियमित घेण्यात येत असतो. ‘यूबीएस’ची मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आणि नवी मुंबईत एेरोली येथेही कार्यालये आहेत.
‘भारतात गुणवंत व बुद्धिमान युवकांची संख्या मोठी आहे. यातीलच अनेक तरुण यूबीएससाठी काम करतात.,’’ असेही एगर यांनी सांगितले.
‘’एेरोलीमध्ये गेल्या वर्षी कार्यालय सुरू करून डिजिटल युगात आंमचा ठसा उमटविण्याच्या उद्दीष्टाला हात घातला आहे. पुण्यातदेखील अशा काही क्षमता निर्माण करण्याचे आमचे धोरण आहे,’’ असे यूबीएसचे जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख माईक डार्गन यांनी नमूद केले
.’’पुणे हे भारतातील सर्वाधिक वेगाने विकसीत होणारे शहर आहे. तसेच शिक्षण, तंत्रज्ञान आणि उत्पादन यांत ते जागतिक स्वरुपाचे केंद्र बनले आहे,’’ असे यूबीएसचे एशिया पॅसिफिक विभागाचे तंत्रज्ञान प्रमुख उदय ओडेद्रा यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आमच्या समुहाने ठरविलेल्या धोरणानुसार, सर्वोत्तम असे बुध्दीमान कर्मचारी व अधिकारी नेमून कंपनीच्या तंत्रज्ञानात मोलाची भर घालण्यात येत आहे.
‘यूबीएस’च्या भारतातील कॉर्पोरेट व सामाजिक जबाबदारी (सीएसआर) योजनेची माहितीही यावेळी देण्यात आली. ‘यूबीएस ऑप्टिमस फाऊंडेशन’तर्फे राजस्थानातील मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या काही प्रकल्पांना निधी पुरविण्यात आला आहे. या फाऊंडेशनचे स्वयंसेवक स्थानिक स्वरुपाची सामाजिक कामे करीत असतात. या दोन्ही कार्यक्रमांतून भारतात मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम उभे राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘’वंचित मुलांच्या शिक्षणासाठी व इतर बाबींसाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संघटनांमध्ये जाऊन काम करण्यास आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना उद्युक्त करीत असतो. भारतातील ‘यूबीएस’च्या सर्व कार्यालयांना हा एकच सीएसआर स्वरुपाचा कार्यक्रम देऊन आम्ही तो मोठ्या प्रमाणात चालवणार आहोत. 2020 या वर्षीपर्यंत आमचे 40 टक्के कर्मचारी अशा प्रकारच्या सामाजिक कांमांमध्ये सहभागी झालेले असतील, असे आमचे उद्दीष्ट आहे,’’ असे एगर यांनी सांगितले.