सर्वोत्तम राज्य आणि सर्वोत्तम समुद्रकिनारी पर्यटनस्थळ (पालोलेम) असण्यावर मोहोर
पणजी – गोवा राज्याला इंडिया टुडे टुरिझम सर्व्हे अँड अवॉर्ड्स २०१८ मध्ये ‘सर्वोत्तम राज्य – ट्रॅव्हलर्स चॉइस’ आणि ‘सर्वोत्तम समुद्रकिनारी पर्यटनस्थळ (पालोलेम- गोवा)’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
गोव्याचे माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी आज गोवा राज्याच्या कामगिरीची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘गोवा हे भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ असल्याचा मी कायम पुनरूच्चार करत असतो आणि सुरक्षा, स्वच्छता, पायाभूत सुविधांचा विकास, नवे पर्यटन उपक्रम व अशा विविध निकषांवर गोवा आघाडीवर राहाण्यासाठी आम्ही विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे.’
इंडिया टुडे पर्यटन पुरस्कार सोहळ्यात गोवा टुरिझमला केंद्रीय मंत्री – राज्य पर्यटन (स्वतंत्र पदभार) श्री. के. जे. अल्फोन्स यांच्या हस्ते सोमवारी नवी दिल्लीत दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केल्यानंतर श्री. आजगांवकर यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
पर्यटनासाठी सर्वोत्तम – गोवा पर्ययन क्षेत्रात समुद्रकिनारे मुख्य आकर्षण असले, तरी राज्यात संस्कृती, साहस आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने इतरही बरंच काही अनुभवता येण्यासारखं आहे. गोव्यात भारतातील सर्वात चांगले आणि उत्तम देखभाल राखण्यात आलेले समुद्रकिनारे आहे. प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला स्वतःची अशी वेगळी खासियत आहे. उत्तर आणि दक्षिण समुद्रकिनारे प्रादेशिक रचना, खाद्यपदार्थ आणि तेथील उपक्रमांच्या बाबतीत एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. ज्या पर्यटकांना निसर्ग आवडतो, ज्यांना सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेले समुद्रकिनारे, रूचकर खाद्यपदार्थ, कला यांच्यावर प्रेम आहे आणि ज्यांना असामान्य स्थापत्यकलेचा अभ्यास करायचा आहे किंवा मसाले नाहीतर काजूच्या बागांची सहल करायची आहे अशांसाठी गोवा आदर्श राज्यआहे. गेल्य काही काळात हे राज्य आपले निसर्गसौंदर्य आणि शांततेमुळे अध्यात्म तसेच योग प्रेमी आणि पर्यायी वैद्यकीय तज्ज्ञांना आकर्षित करत आहे.
सर्वोत्तम समुद्रकिनारी पर्यटनस्थळ – दक्षिण गोव्यात वसलेला पालोलिम समुद्रकिनारा त्याचे भौगोलिक ठिकाण, निसर्ग सौंदर्य व विविध उपक्रमांमुळे भारतातील सर्वात आवडीचा समुद्रकिनारा म्हणून उदयास येत आहे. कौटुंबिक पर्यटक तसेच बॅकपॅकर्स अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांना आकर्षित करणारा समुद्रकिनारा म्हणून तो ओळखला जातो. पालोलिमने गोव्यातील सर्वात चांगल्या समुद्रकिनाऱ्याचे स्थान कायम राखले आहे, कारण तिथे वैविध्यपूर्ण गोष्टी अनुभवायला मिळतात. त्यामध्ये बांबू हट शॅक्स, रंगीबेरंगी कपड्यांची विक्री करणारे स्थानिक, योग, अध्यात्म इत्यादी. इंडिया टुडे पर्यटन पुरस्कार २०१९ द्वारे देशभरातील लोकप्रिय पर्यटन स्थळांची वेगवेगळ्या विभागांनुसार दखल घेतली जाते. यावर्षी आयपीएसओएस या बाजारपेठ संशोधन कंपनीने भारतभरातील १० शहरांत ऑनलाइन व ऑफलाइन सर्वेक्षण केले. विजेत्यांची यादी पर्यटकांची वैविध्यपूर्णतेची– गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांपासून निर्मनुष्य डोंगराळ भागापर्यंत आणि नदीच्या किनाऱ्यांपासून द्रुतगती मार्गांपर्यंत आस दर्शवणारी आहे. पुरस्कारांची रंगत आणखी वाढवण्यासाठी त्यात ‘आयकॉनिक लँडस्केप्स’ आणि ‘सिनिक रोड्स’ असे विभागही ठेवण्यात आले होते.