पुणे : ” विविध कारणांमुळे शहरातील वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पोलिस ठाण्यांकडील पोलिस, गृहरक्षक दल, खासगी वॉर्डन अशा स्वरुपाचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कर्मचाऱ्यांऐवजी सीसीटीव्हीद्वारे ऑनलाईन दंडाची कारवाई होईल.” असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले.शहरातील वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस ते उपस्थित होते. यावेळी माजी महापौर व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी आमदार बापू पठारे उपस्थित होते.
चौतीस गावांमध्ये 1000 कोटीची कामे करणार
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या चौतीस गावांमध्ये बांधकाम आराखडा मंजूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकसन शुल्क घेतले. त्याचे पाचशे कोटी रुपये निधी “पीएमआरडीए’कडे आहे. मात्र, त्यातून”पीएमआरडीए’ ने चौतीस गावांमध्ये कोणतेही विकासकाम सुरू केले नाही. हा विरोधाभास असून, “पीएमआरडीए’ ने हा निधी दिल्यास, त्यामध्ये महापालिका व नगरविकास खाते आणखी पाचशे कोटी रुपयांची भर घालून समाविष्ट गावात एक हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू केली जातील. त्यातून समाविष्ट गावांमधील अनेक नागरी प्रश्न मार्गी लागतील, असेही पाटील यांनी सांगितले.
आठशे पोलिस पुण्यातुन भरती केले जाणार
राज्यातील पोलिस दलामध्ये लवकरच वीस हजार पोलिसांची केली जाणार आहे. त्यापैकी आठशे पोलिस पुण्यातुन भरती केले जाणार आहेत. याबरोबरच पुणे पोलिस दलात वाघोली, खराडी, बाणेर, फुरसुंगी, आंबेगाव, नांदेड सिटी, काळेपडळ अशी सात नवीन पोलिस ठाणीही मंजुर झाली आहेत. त्यासाठी आवश्यक निधीसाठी राज्याच्या वित्त मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

