मुंबई-मराठी चित्रपट निर्मात्या तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक यांना उबेर कॅब चालकाने धमकावल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. स्वतः मनवा नाईकने शनिवारी रात्री एका फेसबुक पोस्टद्वारे या घटनेची आपबिती कथन केली आहे.मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टला उत्तर देत दोषीवर लवकरच कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.


मनवाच्या माहितीनुसार, ‘तिने शनिवारी रात्री घरी जाण्यासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सवरून एक उबेर टॅक्सी बूक केली. त्यानंतर या प्रवासात तिला एकदा नव्हे तर अनेकदा भयंकर प्रसंगांचा सामना करावा लागला. टॅक्सी चालक सातत्याने फोनवर बोलत होता. मनवाने त्याला कार चालवाना फोनवर न बोलण्याची सूचना केली. पण त्यानंतरही त्याने तिचे ऐकले नाही.’मनवा म्हणाली – ‘एवढेच नाही तर पुढे जाऊन त्याने एका रेड सिग्नलचेही उल्लंघन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी अडवली. त्याच्या गाडीचा फोटोही काढला. तेव्हा तो पोलिसांशी हुज्जत घालत होता. मला इच्छित स्थळी लवकर पोहोचायचे होते. त्यामुळे मी पोलिसांना जावू देण्याची विनंती केली. त्यानंतर उबर चालकाने थेट मलाच उद्धटपणे बोलण्यास व धमकावण्यास सुरूवात केली. थांब तुला पाहतोच…असेही तो म्हणाला.’मनवाने सांगितले की, ‘चालकाचे हे वर्तन पाहून मी त्याला गाडी थेट पोलिस स्टेशनमध्ये नेण्याची सूचना केली. पण तो काही ऐकला नाही. तो सतत मला धमकावत होता. हे पाहून मी उबेर सेफ्टीला फोन करुन या प्रकाराची माहिती दिली. पण तेथूनही काही मदत मिळाली नाही.”त्यानंतर ड्रायव्हरने अचानक गाडी चुनाभट्टीच्या दिशेने वळवली आणि कुणाला तरी फोन केला. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी घाबरले आणि गाडी आहे तिथेच थांबवण्याची सूचना केली. पण ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही. त्यानंतर मी आरडाओरडा करण्यास सुरूवात कली. माझे ओरडणे ऐकून दोन दुचाकीस्वार व ऑटोचालकांनी आमची कार थांबवली व माझी सुटका केली.’

