‘सिंहावलोकन’ अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या मार्गावरील एक पाऊल ?
पुणे- ख्यातनाम अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका फेसबूक पोस्ट ने राजकीय वर्तुळात खळबळ उडविली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. आपल्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे.सिंहावलोकन असे नामकरण केलेल्या या पोस्ट मध्ये अनेक बोलके तरीही प्रश्नांकित वलये निर्माण केली आहेत . ‘घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!त्यासाठीच एकांतवासात जातोय.. या वाक्याने राजकीय क्षेत्रात भल्या भल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत . ‘सिंहावलोकन’ अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या मार्गावरील पाऊल ठरेल ? असा प्रश्नही या निमित्ताने हळुवार पाने उच्चारला जाऊ लागला आहे .

जाणून घ्या अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलं आहे.
सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!
घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!
त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!!
टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही
खासदार अमोल कोल्हे हे मुळचे अभिनेते,त्यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरून असंख्य भाषणे गाजविली . परंतु तिथे म्हणतात आदेश बांदेकरांशी त्यांचे बिनसले आणि त्यात बांदेकरांना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे कोल्हे यांनी राष्ट्रवादीचा मार्ग धरला ..२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक लढवत शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला. शिवसेनेचा शिरुर लोकसभेचा बालेकिल्ला उध्वस्त करत अमोल कोल्हेंनी पहिल्याच फटक्यात राजकारणात सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
यानंतर २०१९ विधानसभा निवडणुकांदरम्यानही अमोल कोल्हेंनी अमोल मिटकरी यांच्यासोबत शिवस्वराज्य यात्रेतून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला. या प्रचारसभेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत गेला.मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिरुर लोकसभा मतदार संघात आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात श्रेयवादावरुन मानापमानाचा सामना रंगलेला पहायला मिळाला. यावेळी कोल्हे आणि आढळराव पाटील यांनी एकमेकांवर टीकाही केली.
आता त्यांनी गेल्या वर्षात बेभान होऊन धावत राहिलो ,काही टोकाचे निर्णय घेतले आणि अनपेक्षित पावले उचलली असे म्हणत ओढाताण , तारेवरची कसरत ,वेळेची गणितं,ताण तणाव असे शब्द वापरत थकवा आल्याचे म्हटले आहे . अर्थात हा शाररीक आणि मानसिक थकवा आल्याचा हि उल्लेख करत शाररीक थकवा आरामाने निघून जाईल असे म्हटले आहे . पण मानसिक थकवा घालविण्यासाठी थोडे मनन चिंतन करावे लागेल असे स्पष्ट केले आहे आणि नंतरची वाक्ये मात्र अजूनही महत्वाची आहेत .ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडते आहे . ती आहेत ‘घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!त्यासाठीच एकांतवासात जातोय..
आता कोणत्या निर्णयांनी डॉक्टर असलेल्या अमोल कोल्हे यांना मानसिक थकवा आलाय , त्याचा ते विचार आणि कदाचित फेर विचार करणार आहेत ? हे सर्वांसाठी महत्वाचे ठरणार आहे.

