पुणे/ मुंबई– दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज हे पुण्याच्या आणि मुंबईच्या महापालिका निवडणूक प्रचारात उतरणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पुण्यातील भाजपाचा १०० पार चा नारा उलथवून लावण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी निश्चित असल्याचे बोलले जाते आहे . या आघाडीत प्रचारासाठी पुणेकरांपुढे नेत्यांसह अभिनेते, अभिनेत्री यांची काही नावे पक्षाच्या काही नेत्यांपुढे असून त्यात सर्वात वरचे नाव प्रकाश राज असल्याचे समजते आहे. विजय पाटकर , प्रिया बेर्डे यांना पुण्यातच प्रचाराला थांबविले जाण्याची शक्यता आहे तर प्रकाश राज यांना मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी भाजपा विरोधी प्रचारासाठी पाचारण केले जाईल असे दिसते आहे. एकूणच अनेक हिंदी मराठी अभिनेते आणि अभिनेत्री यांचा समावेश प्रचार आघाडीत कसा करता येईल या संदर्भात विचार सुरु असल्याचे बोलले जाते.
अभिनेता प्रकाश राज हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी आघाडी एकत्र करण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येत आहेत.रविवारी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत राव यांच्या भेटीदरम्यान ते उपस्थित होते .तेलुगू आणि इतर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करणारे प्रकाश राज, समविचारी प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी KCR च्या टीमचे प्रमुख सदस्य म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे टीकाकार, अभिनेते तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) प्रमुखाचे प्रशंसक आहेत. राज यांचे अनेक नेत्यांशी चांगले संबंध असल्याने, KCR विविध पक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी राज यांच्या मध्यस्थीचा मार्ग स्वीकारीत आहेत .

प्रकाश राज यांनी 2019 च्या निवडणुकीत बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तेलुगू चित्रपट उद्योगातील सर्वोच्च संस्था असलेल्या मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन (MAA) च्या निवडणुकीत नुकताच त्यांचा पराभव झाला.धर्मनिरपेक्षता आणि विविधतेत एकता यावर ठाम विश्वास ठेवणारे प्रकाश राज यांनी 2014 पासून नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर कडवा हल्ला चढवण्यासाठी विविध मंचांचा वापर केला आहे .
अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या या अभिनेत्याने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) 2020 च्या निवडणुकीत TRS ला पाठिंबा जाहीर केला होता.

