अभिनेता सौरभ गोखले साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका.
पुणे(शरद लोणकर)-स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रवास उलगडून सांगणाऱ्या कालजयी सावरकर या लघुपटाची नुकतीच घोषणा झाली होती. आता या लघुपटात आणखी कोणते कलाकार असतील आणि ते कोणत्या भूमिका साकारतील याविषयीचा खुलासाही झाला आहे. हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून आणि निवेदक या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट लघुपटातून सांगणार आहे. यामध्ये जेष्ठ हिंदुस्थानची निवेदक म्हणून भूमिका अभिनेते मनोज जोशी तर नव्या तरुण भारताची भूमिका अभिनेता तेजस बर्वे साकारत आहे. लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित असल्याने यामध्ये सावरकरांची भूमिका कोण करणार याविषयी विशेष उत्सुकता होती. आता त्यावरूनही पडदा उठला आहे. अभिनेता सौरभ गोखले हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री पायल गोगटे, अपर्णा चोथे, लिना दातार, ऋता पिंगळे तसेच अभिनेते हृदयनाथ राणे, शंतनू अंबाडेकर, जयोस्तु मेस्त्री, दिनेश कानडे, चिन्मय पाटसकर, हृषीकेश भोसले, पवन वैद्य आणि प्रमोद पवार ह्यांच्या सहयोगी भूमिका आहेत.

लवकरच सदर लघुपटाचे प्रदर्शन सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात याचे विशेष प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक संस्थांपैकी कोणत्याही संस्थेला जर या लघुपटाचे प्रदर्शन आपल्या गावात किंवा शहरात करायचे असल्यास अमोघ पोंक्षे यांच्याशी amogh.parc@gmail.com किंवा ९४२१०१०९७१ येथे संपर्क करावा असे आवाहन निर्मात्यांतर्फे करण्यात आले आहे.