प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. 86 वर्षीय धर्मेंद्र यांना एप्रिल महिन्यातदेखील त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या अपने 2 या चित्रपटाच्या सेटवर पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे आयसीयूत दाखल करण्यात आले होते.
प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईतील याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी 1 मे रोजी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले होते, ‘मित्रांनो, मी एक धडा शिकलो आहे’.

पुढे ते म्हणाले होते, “मित्रांनो, काहीही अति करू नका, मी केले आणि सहन केले. पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले, दोन-चार दिवस कठीण होते. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादाने मी परत आलो आहे, काळजी करू नका मी आता खूप काळजी घेत आहे… लव्ह यू ऑल,” अशा आशयाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता.