पुणे- बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा बुधवारी दुपारी सापडला. डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. अखेर बुधवारी दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. तर, आठवडाभरांनी स्वर्णव सापडल्यानंतर तो सुखरुप असल्याची माहिती मिळताच त्याची आत्या त्याला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, दुर्दैवाने त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेडवरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनीता संतोष राठोड चव्हाण या पती आणि दोन मुलासोबत नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांचे चार चाकी वाहन नगर महामार्गावर आले असताना अपघात झाला. अपघातामध्ये सुनीता संतोष राठोड यांचा मृत्यू झाला. तर समर राठोड (वय १४) आणि अमन राठोड (वय ६) हे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही मुलांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

