नाशिक- राज्यातील बहुचर्चित तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा खटल्यातील सर्व सात आरोपींचीपुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सोमवारी निकाल दिला. या प्रकरणाचा CBI कडे तपास होता.दरम्यान, देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा 2017 मध्ये मृत्यू झाला होता. कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याची 2003 पासून सुनावणी सुरु होती.
न्यायाधीश देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून नियमित सुनावणी सुरू होती. स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी 49 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. एकूण 32 हजार कोटींहून अधिकचा हा घोटाळा आहे. इतर आरोपी रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. भक्कम पुराव्याअभावी या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.