पुणे-” शालेय वयात घडलेल्या चांगल्या संस्कारामुळेच आम्हाला आमच्या जीवनाचे ध्येय यशस्वी गाठता आले त्यामुळे ‘अभिनव प्रशाळेतील शिक्षक, त्यावेळचे विद्यार्थी यांचे आम्ही कायमचे ऋणी आहोत” अशा शब्दात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे आणि एव्हरेस्ट शिखर दोन वेळा सर करणारे किशोर धनकुडे यांनी आपल्या भावना शनिवारी (१६ सप्टेंबर) येथे पार पडलेल्या ‘आम्ही अभिनवकर’ च्या वार्षिक स्नेहमेळाव्यात बोलताना व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध निवेदक आणि अभिनव प्रशालेचे माजी पालक श्री आनंद देशमुख यांच्या हस्ते ‘आम्ही अभिनवकर’ संघटनेतर्फे दिला जाणारा ‘अभिनव-रत्न’ पुरस्कार यंदा अभिजित कुंटे आणि किशोर धनकुडे यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी अभिनव प्रशाळेबाबत कृतज्ञता व्यक्त करताना कुंटे आणि धनकुडे बोलत होते. ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे यांनी बुद्धिबळ स्पर्धेतील यश मिळविताना तसेच किशोर धनकुडे यांनी एव्हरेस्ट शिखर दोन वेळा सर करताना आपले जे प्रेरणादायी अनुभव सांगितले त्याला या मेळाव्यास जमलेल्या ‘अभिनव’च्या माजी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात उत्फुर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी आनंद देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ”अभिनव ही केवळ शाळा नाही तर एक सुंदर कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्याच्या मदतीला येते त्यामुळेच प्रगतीमधील अडसर सहज दूर होतात असे सांगितले. अभिनव प्रशाळेतील शिक्षक हे संस्काराचे स्तंभ आहेत त्यामुळेच अभिनवचे विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत असे त्यांनी अभिमानाने सांगितले. याच कार्यक्रमात आनंद देशमुख यांच्या हस्ते, ‘अभिनव’च्या माजी शिक्षिका स्मिता देशपांडे आणि सुलोचना भोई यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘अभिनव’च्या माजी विद्यार्थिनी नगरसेविका श्रद्धा प्रभुणे-पाठक, अभिनव प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी आणि एकांकिका स्पर्धेत ‘जय-विजय करंडक’ पटकावणाऱ्या अभिनवच्या माजी विद्यार्थी संघाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रारंभी ‘आम्ही अभिनवकर’ संघटनेचे अध्यक्ष पितांबर पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिरीष पुराणिक यांनी आभार मानले. श्री अभिजित देशपांडे आणि ईश्वरी तांबे यांनी सूत्रसंचालन केले. या स्नेहमेळाव्यास तुषार हळबे, मृणाल खर्चे आदी पदाधिकाऱ्यांसह संघटनेचे सुमारे अडीचशे प्रतिनिधी उपस्थित होते.