पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत अभिग्यान कुंडूने दणदणीत त्रिशतक करत आदिनाथ क्रिकेट क्लब संघाला मोठा विजय मिळवून दिला.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अभिग्यान कुंडूच्या तुफानी 320 धावांसह आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने अजिंक्य क्रिकेट क्लब संघाचा 289 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आपले आव्हान बळकट केले. पहिल्यांदा खेळताना आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात केवळ 4 गडी गमावत दमदार 375 धावा केल्या. एकट्या अभिग्यानने तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन करत 26 षटकार व 38 चौकारांसह 320 धावांची त्रिशतकी खेळी केली. अभिग्यानने यापुर्वीही असा पराक्रम केला आहे. 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेदांत गोरे व सुरज गुप्ता यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अजिंक्य क्रिकेट क्लब संघ 16.2 षटकात सर्वबाद 86 धावांत गारद झाला. अभिग्यान कुंडू सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत अनिकेत कुडूकच्या अष्टपैलू बळावर चंद्रोज् संघाने एस्.एस् अकादमी संघाचा 104 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना चंद्रोज् संघाने 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. यात अनिकेत कुडूकने 42 चेंडूत 10 चौकार व एका षटकारासह 70 धावा केल्या तर चैतन्य कोंडभरने आपल्या यशस्वी फलंदाजीत सातत्य राखत 35 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 54 धावा करून संघाचा डाव बळकट केला. 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनिकेत कुडूक व गगनदिप पलाहेच्या अचूक गोलंदाजीने एस्.एस् अकादमी संघ 20 षटकात 9 बाद 84 धावांत गारद झाला. 70 धावा व 3 गडी बाद करणारा अनिकेत कुडूक सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
आदिनाथ क्रिकेट क्लब- 20 षटकात 4 बाद 375 धावा(अभिग्यान कुंडू नाबाद 320(94, 38×4, 26×6), सोहम साळवे 2-39, सिध्दांत छाजेड 2-57) वि.वि अजिंक्य क्रिकेट क्लब- 16.2 षटकात सर्वबाद 86 धावा(ऋषिकेश शिंदे 27(32, 4×4), वेदांत गोरे 4-12, सुरज गुप्ता 2-0) सामनावीर- अभिग्यान कुंडू आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने 289 धावांनी सामना जिंकला.
चंद्रोज्- 20 षटकात 9 बाद 188 धावा(अनिकेत कुडूक 70(42, 10×4, 1×6), चैतन्य कोंडभर 54(35, 4×4, 3×6), राज पडवळ 4-35, निल रोडगे 3-17) वि.वि एस्.एस् अकादमी- 20 षटकात 9 बाद 84 धावा(समर्थ आर 25(50, 4×4), अनिकेत कुडूक 3-23, गगनदिप पलाहे 2-8) सामनावीर- अनिकेत कुडूकचंद्रोज् संघाने 104 धावांनी सामना जिंकला

