मुंबई – समाज हा आपल्या तुमच्या सारख्या लोकांनी मिळून तयार झालेला आहे, परंतु आपल्यातीलच काही अनिष्ट रूढी-परंपरा मुळे माणसातील जनावराचे रूप समोर येते. जातपंचायत हा देखील असाच एक जर्जर रोग आपल्या समाजात फोफावला आहे. याच विषयावर आधारित डी.एस.फिल्म्स निर्मित (निर्माता– दिलीप शहा), ऋषीराज क्रिएशन कृत, राजेंद्र जी. साळी लिखित दिग्दर्शित “आर्त“ हा मराठी चित्रपट २० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
लेखक-दिग्दर्शक राजेंद्र जी. साळी सांगतात की,”आज महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आपण संघर्ष करतोय, परंतु आपल्याच भारत देशात आज ग्रामीण भागात महिलांना जातपंचायतीच्या परंपरेमुळे अनेक हालअपेष्टा आणि अन्यायकारक वागणूक सहन करावी लागते आहे. महिलेला मंदिरात प्रवेश मिळण्याआधी तिला तिच्या चार भिंतीच्या घरात स्वातंत्र्याने जगू देणं अधिक महत्वाचं आहे. “आर्त” चित्रपटातून आम्ही अशाच जातपंचायतीच्या समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटांत गणेश यादव, शितल साळुंखे, जयराज नायर, अजित भगत इ. कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राजेंद्र जी.साळी पुढे सांगतात की, “आर्त” चित्रपटासाठी मी संपूर्ण भारतातील काही प्रमुख भागातील खेड्यांमध्ये जावून अभ्यास केला. अंगावर शहारे यावेत अशा घटना गावकऱ्यांकडून मला समजल्या. या विषयाची दाहकता समाजासमोर मांडणं मला माझं कर्तव्य वाटलं म्हणूनच मी आर्त सारखा सामाजिक चित्रपट केला आहे. आपली आई, पत्नी, बहिण यांचा आदर करणाऱ्या प्रत्येक पुरुषाने तर हा चित्रपट नक्कीच बघावा परंतु महिलांनी देखील हा चित्रपट पाहून आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि जागरूक कसं रहावं हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त चित्रपट करून आम्ही थांबणार नसून या चित्रपटाचा विशेष खेळ लोकसभेतील सदस्यांसाठी आयोजित करणार आहोत. चित्रपटाला सुरेश घायवट यांचे गीत-संगीत लाभले असून, सवांद- मुरलीधर भावसार आणि राजेंद्र जी. साळी यांचे आहे, तर कार्यकारी निर्माता विनोद भा. शिंदे आहेत.

