पुणे- आम आदमी पक्षाने यंदा पहिल्यांदाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. पक्षाने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात पुण्यातील कोथरूडमधून डॉ. अभिजित मोरे आणि पर्वतीतून संदीप सोनावणे यांचा समावेश आहे. प्रीती मेनन यांनी हि माहिती ‘माय मराठी’ला कळविली आहे.
राज्यभरातून इच्छुकांचे अर्ज मोठ्या संख्येने पक्षाच्या राज्य कार्यालयाकडे जमा झाले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया आणि पक्षाची केंद्रीय स्तरावरील संसदीय समितीशी सल्लामसलत करून राज्य प्रचार समितीने ही यादी तयार केली. त्याची घोषणा पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन शर्मा यांनी केली. पुण्यातील दोन उमेदवारांव्यतिरिक्त चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथून पारोमिता गोस्वामी, मुंबईतील जोगेश्वरी पूर्वमधून विठ्ठल लाड, चांदिवलीमधून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे, कोल्हापूरच्या करवीरमधून डॉ. आनंद गुरव, नाशिकमधील नांदगाव येथून विशाल वडघुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आरोग्यक्षेत्रातील समस्यांबाबत सातत्याने आंदोलन करणारे डॉ. अभिजित मोरे हे एमबीबीएस असून त्यांनी ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट’मधून उच्चशिक्षणही घेतले आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून परवडण्याजोगी चांगली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, रुग्ण हक्क यासाठी ते कार्यरत आहेत. ‘आप युवक आघाडी’चे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या संदीप सोनावणे यांनी वकिलीचे शिक्षण घेतले असून ते सामाजिक चळवळीत विशेषत: शिक्षण हक्क चळवळीत सक्रिय आहेत.
”आप’ देशात सर्वाधिक वेगाने वाढणारा राजकीय पक्ष असून अल्पावधीतच दिल्लीमध्ये या पक्षाने आपले सरकार स्थापन केले आहे. भाजप-शिवसेना सरकारचे पाच वर्षातील अपयश व सरकारला धारेवर धरून जनतेचे खरे मुद्दे मांडण्यात कमी पडलेले विरोधी पक्ष यामुळे जनतेला त्यांचा खरा आवाज मिळवून देण्यासाठी पक्ष ही निवडणूक लढवत आहे,’ असे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

