पुणे-सिमेवर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना नृत्यवंदनेतून सलाम करत चाकाच्या खुर्चीवर कायमचे बसून आयुष्याची दुसरी लढाई लढणा-या ‘या’भावांना प्रेमाने औक्षण करण्यासोबतच लाडूचा घास भरवित साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सैनिक मित्र परिवाराने भाऊबीज साजरी केली.
खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसाठी कलाकारांसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .. यावेळी ज्येष्ठ भरतनाटयम नृत्यांगना स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर यांनी सैनिकांना औक्षण करुन त्यांच्याशी संवाद साधला. केंद्राचे प्रमुख पी.आर.मुखर्जी, कर्नल बी.एल.भार्गव, ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, शंकर निंबाळकर, साहिल केळकर, प्रसाद भडसावळे, सुवर्णा गोडबोले, संगीता मावळे, प्रशांत पंडित स्वाती रजपूत, संकेत निंबाळकर, नरेंद्र व्यास, नंदा पंडित, गंधाली शहा, कल्याणी सराफ, अनिल दिवाणजी, समृद्धी पाटेकर, पूर्वा देशपांडे उपस्थित होते. दोन्ही कलाकारांनी भरतनाटयम् नृत्यातून सैनिकांना मानवंदना दिली. उपक्रमाचे यंदा ४ थे वर्ष आहे.
स्वाती दैठणकर म्हणाल्या, देशाच्या सिमेवर लढणा-या जवानांमुळेच आम्ही सुखाचे दोन घास खाऊ शकतो, याची आम्हाला जाण आहे. युवकांच्या मनात देशाविषयी आणि सैन्याविषयी आपुलकीची भावना जागृत करण्याकरीता आम्ही नृत्यातून नेहमीच प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. नुपूर दैठणकर म्हणाल्या, समाजातील सर्व घटकांपेक्षा सैनिकांचे कार्य मोठे आहे. त्यांचा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला हवा.
पी.आर.मुखर्जी म्हणाले, अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोेबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. केवळ सैनिकच देशसेवा करतात असे नाही. तर देशातील प्रत्येकजण आपापल्यापरीने आपल्या क्षेत्रात योगदान देऊन देशसेवाच करीत असतो.
अपंग सैनिक भोपालसिंग चौधरी म्हणाले, आज भाऊबीज साजरी करताना आमच्या कुटुंबियांसमवेत भाऊबीज साजरी केल्याचा आनंद मिळाला. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. अपंगत्व आले असले तरी आमचे मनोबल खचले नाही, असे त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. पीयुष शहा यांनी प्रास्ताविक केले.
साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रात अनोखी भाऊबीज
Date: