इयत्ता ९ वी हिंदी कुमारभारती (प्रथम भाषा) पुस्तकात आनंद बनसोडे यांचा संघर्षप्रवास अभ्यासासाठी
९ वी नापास होवून केले होते मेकॅनिकचे काम, आता “सपनो से सत्य की और” या धड्याद्वारे युवकांना प्रेरणा मिळणार
पुणे- भारताचा एव्हरेस्टवीर, विक्रमवीर आनंद बनसोडे याने ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सर करून इतिहास घडवला आहे व आपल्या अनेक विक्रमाद्वारे सतत सर्वाना प्रेरणा दिली आहे. पण याच एव्हरेस्टवीर आनंदला एकेकाळी “संभाजी प्रशाले” मध्ये ९ वी मध्ये नापास होवून शाळा सोडावी लागली होती. “९ वी नापास” असा शिक्का असणाऱ्या व कालांतराने आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवत महान कार्य करून दाखवणाऱ्या सोलापूरच्या सुपुत्राचा धडा ९ वी च्या हिंदीच्या अभ्यासक्रमात घेण्यात आला आहे. एके काळी “९ वी नापास” असा शिक्का असणाऱ्या आनंदचा धडा ९ वी च्याच पुस्तकात येणे ही प्रेरणादायी बाब आहे. लहानपणी एका छोट्या अंधाऱ्या झोपडीमध्ये राहणाऱ्या आनंदचे त्यावेळचे जीवन म्हणजे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक बाबतीत अतिशय न्यूनगंडाने व अपयशाने भरलेले होते. त्यावर मात करत जगाची सर्वोच्च उंची गाठण्याचा प्रेरानादाई प्रवासामुळे अनेक युवकांना अपयशामुळे न खचण्याची शिकवण देईल.
लहानपणापासूनच स्वप्नवादी असणाऱ्या आनंदला अभ्यास मात्र जमत नव्हता. त्यामुळे ९ वी नापास होवून आपल्या वडिलांच्या गॅरेज मध्ये काम करण्यास जात होता. पण आपल स्वप्न जगण्यासाठी शिक्षणाचे महत्व ओळखून आईच्या प्रेरणेने आनंदने पुन्हा ९ वी मध्ये प्रवेश घेवून शिक्षण पूर्ण केले. सध्या पुणे विद्यापीठात फिजिक्ससारख्या अवघड विषयात संशोधन करणाऱ्या आनंदने २०१२ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. यानंतर “वल्ड पीस सेव्हन समिट” मोहीम काढून जगातील ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. याशिवाय प्रत्येक शिखरावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वल्ड रेकॉर्ड मध्ये अनेक विश्वविक्रम केले आहेत. या सर्व संघर्षामधून युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून आनंदचा पाठ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक पुस्तक निर्मिती, हिंदी विभागाने ९ वी च्या पुस्तकात समाविष्ट केला आहे.
या पाठात आनंदचा लहानपणापासूनचा संघर्ष व एव्हरेस्ट सर करताना आलेल्या अडचणीद्वारे आनंदने मात करून मिळवलेले यश ७ पानांच्या धड्यात अधोरेखित केले आहे. या धड्यामुळे आनंदचे कुटुंबीय व मित्रपरिवारात जल्लोष साजरा करण्यात आला. हा धड्यासाठी डॉ. बंडोपंत पाटील यांचे सहकार्य मिळाल्याचे एव्हरेस्टवीर आनंदने सांगितले.
सोशल मिडिया वरून व्हायरल-
९ वी नापास असलेला शाळा सोडल्याचा दाखला व ९ वी च्या पुस्तकातील हा धडा आनंदने फेसबुक पोस्ट टाकताच पूर्ण महाराष्ट्रात ही पोस्ट व्हायरल झाली असून पूर्ण महाराष्ट्रातून आनंदला दिवसभर फोन येत आहेत. “९ वी नापास व शाळा सोडल्याचे कारण” या दाखल्यावर आनंदने अधोरेखित केले होते व त्यासोबतच हा धडा असलेली पोस्ट सर्वाना प्रेरित करत आहे.
आनंद बनसोडे-
“तुम्ही कोणीही असा काहीही करत असा जर एखादी इच्छा तुमच्या मनात असेल आणि तुमचा त्यावर मनापासून विश्वास असेल तर कितीही अपयश आले, नकारात्मक घटना घडल्या तरी ती गोष्ट सत्यात आणण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असते”. जेव्हा मी ९ वी नापास झालो होतो त्यावेळी सर्व काही संपले होते..”मी आयुष्यात काहीही बनू शकणार नाही” असा शिक्का मारला गेला होता..पण मला माझ्या स्वतवर विश्वास होता..माझ्या स्वप्नांवर विश्वास होता..आणि मी तेच करून दाखवले जे मला मनापासून करावयाचे होते..आणि योगायोग असा की आज ९ वी च्याच पुस्तकात माझा धडा घेतला.
“सर्वात मोठे अपयश आपल्यासोबत तेवड्याच मोठ्या यशाची बीजे घेवून येत असते”, हाच प्रेरानादाई संदेश या पाठमार्फत मुलांपर्यंत जावून अपयशामुळे निराश होणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.”
गुरुशांत धुत्तरगांवकर (आनंदचे मित्र व नगरसेवक) (फेसबुकवरील प्रतिक्रिया)
“क्रिकेट सामन्यामुळे दहावी परिक्षेला बसू न शकलेल्या सचिन तेंडूलकरच्या जीवनावर दहावीच्या इंग्रजी पुस्तकात धडा येणं… याला म्हणतात खरं यश… असं उदाहरण यापूर्वी द्यायचो… आता एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचेही उदाहरण आम्हाला देता येईल.”