राज सन्मान करंडक २०१९ : ‘टॅंजंट’ची विजेतेपदावर मोहोर
पुणे : रंगभूमीवर आज अनेक नवनवीन प्रयोग सातत्याने होत आहेत. याच प्रयोगांच आत्मपरीक्षण आपण या स्पर्धांच्या माध्यमातून करू शकतो. अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मनात कोणतीही भीती नसणे आवश्यक आहे, भीती घालविण्यासाठी एकांकिका हे सर्वोत्तम माध्यम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी जास्तीत जास्त एकांकिका स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे मत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी व्यक्त केले.
मनविसे कोथरूड विभागाचे अध्यक्ष शशांक अमराळे यांच्या वतीने ‘राज सन्मान करंडक २०१९’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे करण्यात आले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार बोलत होते. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, स्पर्धेचे निमंत्रक किशोर शिंदे,एमआयटीचे प्रकुलगुरू डॉ. मिलींद पांडे, प्रशांत कनौजिया, कल्पेश यादव, संजय काळे, सारंग सराफ, अमोल शिंदे, अभिषेक थिटे, परीक्षित शिरोळे, सचिन ननावरे, चेतन धोत्रे, सुरेखा होले, उषा आवळे, अनिता शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत १० संघांनी अंतिम फेरीत एकांकिका सादर केल्या. दिपाली निरगुडकर व अशोक आढावतकर यांनी प्राथमिक फेरीचे तर अश्विनी आरे, संजय डोळे व सूरज पारसनीस यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले.
स्पर्धेचे विजेतेपद काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘टॅंजंट’ या एकांकिकेने पटकावले. दुसरे पारितोषिक सर परशुरामभाऊ महाविद्यालायाच्या ‘ऐनावरम’ या एकांकिकेला तर तिसरे पारितोषिक राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘द पिंक इन द रेनबो’ या एकांकिकेला मिळाले. सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी वैभव काळे (टॅंजंट, काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), सर्वोत्तम लेखनासाठी हेमंत पाटील व तेजस परसपाठी (टॅंजंट, काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय) यांना पारितोषिक देण्यात आली. सर्वोत्तम स्त्री अभिनयासाठी पूर्वा देशपांडे (ऐनावरम, स. प. महाविद्यालय) तर सर्वोत्तम पुरुष अभिनयासाठी तेजस कुलकर्णी (द पिंक इन द रेनबो, राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय) यांना सन्मानित करण्यात आले. ध्वनीसाठी अथर्व वडके, यश लोणकर व मुकुंद कोंडे यांना, नैपथ्यसाठी शिवम समर्थ व श्रेया टोके यांना तर, प्रकाश व्यवस्थेसाठी प्रतिक भावसार व रोहन कडू यांना सन्मानित करण्यात आले. विजेत्या संघांना रोख रक्कम, करंडक व प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे आयोजक आणि मनविसे कोथरूड विभागाचे अध्यक्ष शशांक अमराळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित वारानशीकार यांनी केले.