पुणे: सनातन प्रभात ही वैदिक संघटना आपल्या दुष्कृत्यांना हिदुंचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोर्चे काढते आहे. सनातन संस्थेवर बंदी येवू नये म्हणून हिंदुंचाच बुद्धीभेद करत वापर करते आहे. २०२३पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या वल्गना करते आहे. ही संघटना कधीही हिंदुंची नव्हती तर हिंदु शब्दाच्या नांवाखाली वैदिक अजेंड राबवत होती हे या संघटनेच्या आहारी जाणा-या हिंदुंना समजायला हवे. या संस्थेवर लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी असे आवाहन आदिम हिंदू परिषदेचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी केली आहे.
सनातन प्रभात ही संस्था हिंदुविरोधी आहे. अलीकडेच मातंग समाजाच्या नवरदेवाने मंदिर प्रवेश केला तर त्याला मारहाण करण्यात आली. त्याबद्दल या संस्थेने ब्र काढला नाही. वर्णद्वेषी मेघा खोले या महिलेने एका हिंदु स्त्रीचा अपमान केला. शनी मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलने होत असता ही संस्था गप्प बसली. ही संस्था खरेच हिंदुंसाठी असती तर असे घडले नसते. वैदिक धर्मातील विषमता आणि स्त्रीयांबद्दलचा विकृत दृष्टीकोन जपण्याचे व पसरवण्याचे कार्य ही संस्था करत आली आहे. या संस्थेवर हिंदु तरुणांना शस्त्रास्त्रांचे शिक्षण देत अनेक हत्या व स्फोट घडवुन आणल्याचे आरोप आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनाच्या संशयात भोव-यात सनातन सापडली आहे. तपासयंत्रणा आपले काम करत असतांना त्यांच्यावर दबाव आणण्याचा आणि हिंदुंचा त्यासाठी वापर करण्याच्या प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो असेही सोनवणी म्हनाले.
ते पुढे म्हणाले की अशा या हिंदुविरोधी आणि सनातनने स्वतःच मोर्चे काढून हिंदूंचे त्यांना समर्थन आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. सर्वसामान्य हिंदूंचे या वैदिकी सनातनला कुठलेही समर्थन नाही. सनातन ही वैदिक धर्माचे प्रतिनिधित्व करते, हिंदुंचे नाही. हे असे प्रयत्न सनातनने थांबवले नाहीत तर हिंदूच सनातनविरुद्ध हिंदूंनीच प्रतिमोर्चे काढतील असा इशाराही सोनवणी यांनी दिला.

