पालिकेच्या अंदाजपत्रकात १७०० कोटी रुपयांची तूट- भाजपकडून पुणेकरांची फसवणूक :माजी उपमहापौर आबा बागुल
पुणे
महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सुमारे १७००कोटी रुपयांची तूट आल्याचा पर्दाफाश प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केला असून सत्ताधारी भाजपने करदात्या पुणेकरांची फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे.
पालिकेच्या सन २०१७-२०१८ साठी ५हजार ९१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मुख्यसभेने मान्यता दिली मात्र सद्यस्थितीत आढावा घेतला असता केवळ ४२२६ कोटी रुपयेच जमा झाले आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने दिलेले आश्वासने भुलथापाच ठरल्या आहेत असे स्पष्ट करून माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, अंदाजपत्रकाचा आढावा घेतला असता महसुली खर्च [ पगार , मेंटेनन्स ] हा २२९७कोटी रुपये असून विकासकामांना केवळ १५५० कोटी रुपयेच उपलब्ध झाल्याने त्याचा फटका शहराच्या विकासाला बसला आहे त्यामुळे निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपने केवळ आकडे फुगवून अंदाजपत्रक सादर केले आणि विकासाचे गाजर पुणेकरांना दाखवले हेच आता अधोरेखित झाले आहे. एकीकडे अंदाजपत्रकात इतकी मोठी तूट असताना केंद्राकडून जीएसटीतुन तीन महिन्यांचे सुमारे १८ कोटी आलेले नाहीत, हेही निदर्शनास आले आहे. केंद्र -राज्य सरकारकडे असलेली थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याची गरज असताना त्याकडे सत्ताधारीच काय प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे असेही आबा बागुल यांनी नमूद करताना एकूणच हे अंदाजपत्रक फसवे आहे का ? असा सवाल केला.
उपमहापौरपदाच्या कालावधीत शहर विकासाला चालना मिळण्यासाठी पालिकेला उत्पनाचे स्रोत कसे वाढतील यासाठी रेव्हन्यू कमिटीची स्थापन केली होती. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करताना जमा किती , खर्च किती याचा सातत्याने आढावा प्रशासनाबरोबर काँग्रेसकडून घेतला जात होता मात्र सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले परिणामी आज मोठ्याप्रमाणावर तुटीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेव्हन्यू कमिटीचे महत्व लक्षात घेऊन अंदाजपत्रकात तूट का आली याचा गांभीर्याने विचार करावा आणि अंदाजपत्रकाद्वारे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करणार याचा खुलासा भाजपने करावा अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.