पदपथावरील मुलांसाठी ‘ संगणक आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ
पुणे
घरची हलाखीची परिस्थिती इतकेच काय राहावयासही घर नाही,पदपथावर आडोसा करुन,ज्या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत अशा ठिकाणी वास्तव्य करून पोटाची खळगी भरण्यासाठी आई -वडिलांना मदत व्हावी यासाठी सिग्नलवर फुले ,चिक्की विक्री करणाऱ्या मुलांनी वाय -फाय ,फोरजीच्या युगात प्रथमच संगणक हाताळला.
निमित्त होते, पदपथावरील मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने सुरु केलेल्या ‘संगणक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभाचे.आयुष्यात प्रथमच संगणक पाहणाऱ्या या मुलामुलींच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव दिसले आणि मला जमेल कि नाही हा प्रश्नार्थक भावही चेहऱ्यावर दिसत होता मात्र शिक्षक जस जशी माहिती देत होते तसे या मुलांचे चेहरे खुलत होते. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या उपस्थितीत आणि मुलांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत आठवड्यातून दोन दिवस शहरातील विविध पदपथांवर राहणाऱ्या मुलामुलींना संगणकाची माहिती व्हावी, आर्थिक दुर्बल घटकांतील ;पण शिक्षण घेत असलेल्या मुलानांही संगणक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. याबाबत या उपक्रमाचे संयोजक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल म्हणाले, आज वाय -फाय ,फोरजी च्या युगात समाजातील अशी कित्येक घटक आहेत कि,ज्यांना परिस्थितीमुळे संगणक काय असतो याची माहितीही नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी आई -वडिलांना हातभार लावताना ते त्यांच्या बालपणालाही मुकले आहेत.मोबाईल काय असतो हे त्यांना केवळ माहित आहे ते लोकांच्या हातात दिसत असल्याने ;पण इंटरनेट काय असते ,संगणक कसा असतो याची माहिती तर त्यांना अजिबात नाही. जे शिकत आहेत त्यांना थोडीफार माहिती आहे मात्र त्यांना संगणक कधी हाताळायला मिळालेलाच नाही. एकदिवस या मुलांसमवेत चर्चा केली,त्यांनी आम्हाला संगणक कसा असतो ? दाखवाल का ?हे प्रश्न जसे विचारले तसे आम्हाला शिकायचे अशी अपेक्षाही व्यक्त केली आणि त्यातूनच संगणक आपल्या दारी या उपक्रमाचे नियोजन आम्ही केले . आठवड्यातून दोन दिवस हा उपक्रम पदपथावरील, गरीब कुटुंबातील मुलामुलींसाठी राबविला जाणार आहे. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे घनःश्याम सावंत , नंदकुमार बानगुडे तसेच अभिषेक बागुल , इम्तियाज तांबोळी, राजू पोळ , समीर शिंदे , नारायण टेकाडे ,अरुण कामठे , स्वप्नील नाईक , धनंजय कांबळे विक्रम खन्ना , , सुरेश कांबळे , हेरॉल मसी , सागर आटोळे , भरत तेलंग , महेश ढवळे , राजू ससाणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मी समाजासाठी …
मी समाजासाठी ,समाज माझ्यासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन समाजपयोगी कार्य करताना काशीयात्रा असो किंवा ,अंध व्यक्ती , पदपथावरील मुलांसमवेत दिवाळी ,एड्सग्रत मुलांसमवेत रंगपंचमी, हवाई सफर, यासह विविध उपक्रम सदैव राबविणारे माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, वंचित घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे, तेही या समाजाचे घटक आहेत. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी सरसावले पाहिजे, या हेतूने आता हा उपक्रम सुरु केला आहे. भविष्यात या मुलांच्या शिक्षणासाठी खास व्यवस्था करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.

