पुणेकरांना आता घडणार खगोल विश्वाची सफर ! सात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उदघाटन..
पुणे महानगरपालिकेने साकारले देशातील पहिले थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तारांगण
माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल यांचा उपक्रम
पुणे(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही उदबोधक तथ्यांची माहिती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिकेच्यावतीने सहकारनगर येथील स्व . राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमध्ये अत्याधुनिक थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित तारांगण उभारण्यात आल्याने पुणेकरांना आता खगोल विश्वाची सफर घडणार आहे . पुणे महानगरपालिकेचा देशातील हा पहिला प्रकल्प असून तो देशात आघाडीचा ठरणार आहे असा विश्वास माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
याबाबत माहिती देताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, आपल्या कारकिर्दीत विज्ञान, तंत्रज्ञानाबाबत विशेष सजग असलेले दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे नाव या तारांगणाला देण्यात आले आहे. हे तारांगण संपूर्ण वातानुकूलित आहे. तारांगणाच्या डोम व्यास सुमारे ९. ५० मीटर असून तो ‘एफ. आर. पी . ‘मध्ये तयार करण्यात आला असून १५ अंशात पुढील बाजूस डोम बसविल्याने प्रेक्षकांना प्रत्यक्ष खगोल विश्वात असल्याची अनुभूती मिळते. अवकाशातील रचना आणि घडामोडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक ४ के रेझ्यूलेशनचे ३ व्हिज्युलायझे शन डिजीटल तंत्रज्ञानाचा आणि १०. १ क्षमतेच्या ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
अवकाशात असलेल्या ग्रहताऱ्यांची रचना, त्यात घडणाऱ्या ग्रहणांसारख्या घटना याबाबत सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत त्रोटक माहिती उपलब्ध होते. ही माहिती दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे जिज्ञासूंसमोर मांडण्यासाठी या तारांगणाची उभारणी करण्यात आली आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद उपळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ३ डी तंत्रज्ञानाचा चष्म्याविरहित वापर करण्यात आला आहे. ५२ आसन क्षमता या तारांगणाची असून खुर्च्या आवश्यक त्या कोनात पुढे -मागे होणाऱ्या असून स्लीपिंग चेअर पद्धतीच्या आहेत. जगात प्रसिद्ध असलेल्या आणि फुलडोम पद्धतीचे थ्री डी फिल्म्स ,शो करणाऱ्या फुलडोम प्रो या रशियन उत्पादक कंपनीने सर्व्हर आणि सॉफ्टवेअर पुरविले आहे. हायडेफिनेशनचे आठ प्रोजेक्टर उच्चक्षमतेची आधुनिक ध्वनी यंत्रणा आहे. सद्यस्थितीत कंपनीने इंग् रजी माध्यमातील २० फिल्म्स उपलब्ध करून दिल्या असून मराठी आणि हिंदी माध्यमातूनही फिल्म्स दाखविणे सहजशक्य आहे. या प्रकल्पाला संपूर्ण देखभालीचा खर्च तीन वर्षे नाही. या तारांगणाच्या निर्मितीसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तारांगणामध्ये साधारण २० ते २५मिनिटांचा कालावधी हा फिल्म्ससाठी असणार आहे. देशात मोजकीच तारांगणे उपलब्ध असून पुण्यातील हे तारांगण अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले.
विद्यमान आणि माजी सात मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत लवकरच उदघाटन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत बहुमूल्य योगदान देणारे सर्वश्री शरद पवार, . मनोहर जोशी, . शिवाजीराव निलंगेकर पाटील ,. सुशीलकुमार शिंदे , मा. .पृथ्वीराज चव्हाण , .नारायण राणे , .अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख थ्री डीव्हिज्युलायझेशन डिजिटल ता रांगणाचे लवकरच उदघाटन होणार असून दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी आणि सर्व कुटुंबीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असेही आबा बागुल यांनी सांगितले.