- पहिल्या टप्प्यात प्रतिदिन ५ लाख लिटर सांडपाणी होणार शुद्ध
- ‘टायगर बायो फिल्टर ‘ या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर
- शुद्ध झालेल्या पाण्याचा पुनर्वापर उद्याने , स्वच्छतागृहे, नवीन बांधकामांवर होणार
- एका प्रकल्पामुळे ३६५ एमएलडी पिण्याचे पाणी प्रति वर्ष वाचणार
- प्रति लिटर नाममात्र खर्च
पुणे –दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि निसर्गाचा लहरीपणा … भूगर्भात आटत चाललेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. मात्र पाणीबचतीसाठी शाश्वत आणि ठोस पर्याय ठरणारा देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प पुण्यात साकारला आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून संपूर्ण शहरात असे प्रकल्प उभारल्यास सुमारे ५ टीएमसी पिण्याच्या पाण्याची बचत सहजशक्य असल्याची माहिती माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यानात माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे स्वयंपाकासाठी तसेच अंघोळीसाठी वापरले जाणारे पाणी शुद्ध करून पुन्हा वापरात आणण्यासाठी महत्वपूर्ण असणारा देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आबा बागुल म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मापदंडानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सांडपाणी शुद्ध करण्यासाठीची प्रक्रिया नाममात्र असून या प्रक्रियेत पाण्याचा रंग, चव व वास नष्ट केला जातो. तसेच पाण्यातील जंतू व अन्य गोष्टी नष्ट केल्या जातात. या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘टायगर बायो फिल्टर ‘ या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ग्रे वॉटर स्क्रिनींग नंतर पंपाद्वारे बायो मिडिया फिल्टर बेडवर सोडण्यात येते. रसायनांचा वापर या प्रकल्पामध्ये नाही. पहिल्या टप्प्यात प्रतिदिन ५ लाख लिटर सांडपाणी शुद्ध होणार आहे .दुसऱ्या टप्प्यात १० लाख लिटर सांडपाण्यावर पाण्यावर दररोज प्रक्रिया होणार आहे आणि शुद्ध झालेल्या पाण्याचा पुनर्वापर हे उद्याने , स्वच्छतागृहे, नवीन बांधकामांवर होणार आहे. या प्रकल्पामुळे सुरुवातीला १८२. ५ दशलक्ष लिटर आणि नंतर १० लाख लिटर क्षमता झाल्यावर ३६५ एमएलडी पिण्याचे पाणी प्रति वर्ष वाचणार आहे. प्रक्रियेसाठी प्रति लिटर ५ पैशापेक्षाही कमी म्हणजे थोडक्यात नाममात्र खर्च येणार आहे.गेली ७ वर्षे या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरु होता . दोन वर्षांपूर्वी माझ्या प्रभागात ग्रे वॉटरचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, काही हितचिंतकांनी विरोध केला होता. हा प्रकल्प राबविण्यासाठी सुमारे दीड हजार इमारतींमधील अंघोळीचे आणि स्वयंपाकाचे पाणी रोज एकत्र केले जाणार आहे. त्यासाठी २.५ किमीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्या पाण्यावर प्रक्रिया होऊन ते उद्याने, स्वच्छतागृहे, नव्या बांधकामांसाठी वापरता येणार आहे. परिणामी पाणी बचतीला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले तसेच या प्रकल्पासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार तसेच हेमंत देवधर,श्री. खानोरे व पालिकेचे अधिकारीवर्ग आणि प्रायमूव्ह कन्स्लटंटसचे सहकार्य लाभले,असेही सांगितले.
समान पाणीपुरवठा योजनेपेक्षा पाणी पुनर्वापराला चालना हवी
या प्रकल्पासाठी १ कोटी ५७ लाख रुपये खर्च आला असून समानपाणीपुरवठा योजनेपेक्षा सर्व प्रथम असे प्रकल्प शहराच्या सर्वच भागात उभारणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता नसेल तर समान पाणीपुरवठा योजना कशी मार्गी लागणार. त्यातही नवीन धरणे बांधणे शक्य नाही त्यामुळे पाणीबचतीला चालना देणारे आणि पाण्याच्या पुनर्वापराला महत्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पाची व्याप्ती वाढणे हे शहराच्या हिताचे ठरणार आहे याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधताना पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी सर्वच प्रभागात आयुक्त कुणाल कुमार यांनी हा प्रकल्प राबवावा असे आवाहनही केले.

