विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवा : शरद पवार
आबा बागुल यांचे कार्य आदर्शवत, आता मुंबईची संधी द्या
पुणे :विकासकामे कोणतीही असू द्या, त्यात पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. नगरसेवक आबा बागुल यांची कल्पकता आणि सातत्याने राबविलेले विकासाचे प्रकल्प हे आदर्शवत आहेत. 30 वर्षे लोकप्रतिनिधी असलेल्या आबा बागुल यांना आता मुंबईत पाठविण्याची गरज आहे. अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी बागुल यांच्या कार्याचा गौरव केला.
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी माता मंदिराला शरद पवार यांनी शनिवारी भेट दिली. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, चेतन तुपे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक व अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटनला मी परदेशात असल्याने येऊ शकलो नाही. याची मला अस्वस्थता होती. त्यामुळे मी आज आवर्जुन याठिकाणी आलो आहे. तसं मी यापूर्वी कै. वसंतराव बागुल उद्यान उद्घाटनावेळी तसेच महर्षी पुरस्कार वितरण आणि अन्य एका कार्यक्रमासाठी आलो आहे. असे स्पष्ट करून पवार म्हणाले, आबा बागुल यांच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. लोकप्रतिनिधी या नात्याने परिसराचा सर्वांगीण विकास करताना जनतेच्या हिताला दिलेले प्राधान्य हे सर्वांसाठी आदर्शवत आहेत. सातत्याने विकासाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करून ते यशस्वी कसे होतील याकडे सदैव लक्ष असणारे आबा बागुल हे एक दक्ष लोकप्रतिनिधी आहेत. आज 30 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून आबा कार्यरत आहेत. आणखी 20 वर्षे झाली की ते माझ्या रांगेत येऊन बसतील. त्यामुळे आता आबा बागुलांना मुंबईला पाठवलेच पाहिजे, असेही पवार म्हणाले.
आबा बागुल यांच्या काशी यात्रेचा उल्लेख करताना पवार म्हणाले, खरंच प्रत्येाकाला वाटतं काशीला एकदा जावून यावे. पण, मी इथे एक सूचना करतो, एक वर्ष काशी यात्रा घ्या. दुसर्या वर्षी भारतात जालियानवाला बाग, वाघा बॉर्डर अशी अनेक ठिकाणे आहेत, तेथे लोकांना घेऊन जा. सर्वधर्म समभाव कसा जोपासला जाईल याबरोबरच सियाचीन सारख्या भागामध्ये आपले जवान देशासाठी कसे कार्यरत आहेत, हे ही यानिमित्ताने लोकांना कळेल. विविध भाषा, प्रांत याचीही संपूर्ण माहिती होईल.
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये आबा बागुल यांनी तारांगण उभे केले आहे. खरंच, ही बाब कौतुकास्पद आहे. पण, निव्वळ तारांगण सुरू केल्यानंतर तिथे प्रत्येक दिवशी कसा कार्यक्रम असावा, हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. यासाठी आबा बागुल आणि त्यांच्या पदाधिकार्यांनी मुंबईतील जवाहरलाल नेहरू प्लॅनोटोरियम सेंटरला भेट द्यावी. त्याचा अध्यक्ष मीच आहे. त्यामुळे तारांगणाच्या परिपूर्ण प्रक़ल्पासाठी आपल्याला मी सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल खरंच आदर्शवत शाळा आहे. राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणले. पण, ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आबा बागुल यांनी खर्या अर्थाने ही शाळा उभारली. या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात उज्ज्वल भविष्य नक्कीच असेल, असेही ते म्हणाले.
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतीय. परिणामी पर्यावरणाचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहीजे. वृक्षवल्ली कशी जोपासली जाईल, परिसर कसा हिरवागार करता येईल, त्यासाठी कृती कार्यक्रम घेण्याची गरज आहे. आबा बागुल यांनी त्यांच्या परिसरातील नाल्यांचा केलेला विकास खूप चांगला आहे. नाल्यांचा विकास करताना परिसर हरित केला, त्या दृष्टीने सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.
प्रास्तविकात आबा बागुल म्हणाले, 23 वर्षांनी आज शरद पवार यांचे पुनरागमन झाले आहे. माझ्या 30 वर्षाच्या राजकारणात शरद पवार यांचा आदर्श आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान पद मिळण्याचे एकमेव नेेतृत्व आणि व्यक्तीमत्त्व म्हणजे शरद पवार. पुढील 50 वर्षात असे नेतृत्व, व्यक्तिमत्त्व होणे शक्य नाही.
सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले.