दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन
समाजाच्या रक्षणासाठी सतत दक्ष असणाऱ्या पोलिसांना कर्तव्य बजावताना वेळेचे बंधन नाही पर्यायाने कुटुंबासमवेत सण साजरा करताही येत नाही. सतत ताणतणावात असणारे पोलीस मात्र दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामुळे तणावविरहित दिसले.
समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलॆल्या पोलीसबांधवाना कोणताही सण साजरा करता येत नाही. घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे, जिव्हाळयाचे नाते निर्माण व्हावे या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून माजी उपमहापौर आबा बागुल , पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस अमित बागुल यांच्या पुढाकाराने दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पाटील ,गुन्हे शाखेचे इंदलकर , पीएसआय जाधव, संयोजक अमित बागुल आणि पोलीसवर्ग उपस्थित होता.
आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधून निर्माण होणारे प्रेम आणि आपुलकीचे क्षण आमच्यासाठी खुपच महत्वाचे आहे. या आपल्या नात्यांचे अतूट बंधन दृढ करण्याची ग्वाही देताना समाजाच्या रक्षणाबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष राहू असे वचन दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात भगिनींना दिले.
… आणि उपस्थितही गहिवरले !
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी ‘ते’ येताच आई-वडिलांविना पोरकी असलेल्या मुलां -मुलींनी आमचे भाऊ आले हे उदगार काढताच उपस्थित काही काळ गहिवरले. खाऊ , भेटवस्तू आणि गप्पा यात ही मुले त्यांचा दुर्धर आजारही काही क्षणासाठी विसरूनही गेले. येवलेवाडी -कात्रज येथील ममता फौंडेशनच्या आश्रमातील दुर्धर आजाराने ग्रस्त मुलींसमवेत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस अमित बागुल आणि कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन साजरी केली.