२०० कोटींच्या कर्जरोख्यांमुळे पुणेकरांवर प्रतिदिन ५ लाखांच्या व्याजाचा ‘भार ‘ उचललेले कर्ज तात्काळ बँकेला परत करा; माजी उपमहापौर आबा बागुल
पुणे-
समान पाणीपुरवठा योजनेतील अनागोंदीचा पर्दाफाश झाल्याने आता पुन्हा नव्याने फेरनिविदा काढण्यात येणार आहे मात्र मोठ्या गाजावाजाने कर्जाचे सेलिब्रेशन करून देशातील पहिली महापालिकेचा ‘किताब ‘ मिळविण्याचा खटाटोप आता प्रशासनाच्या अंगलट आला आहे. पालिका प्रशासनाने कर्ज उचलले मात्र त्याच्या व्याजाचा ‘ भार’ पुणेकरांवर नाहक पडणार आहे. प्रतिदिन पाच लाख रुपये व्याजापोटी द्यावे लागणार असल्याने तात्काळ हे कर्ज बँकेला परत करण्याची मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांसह मुख्यलेखापालांकडे केली आहे.
यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात समान पाणीपुरवठा योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद असताना तसेच चोवीस तास पाणीपुरवठ्याचे कोणतेही काम सुरु झालेले नसताना कर्जरोख्यातून उभारलेले दोनशे कोटी रुपये बँकेकडून उचलले ;पण व्याजापोटी प्रतिदिन पाच लाख रुपये आपल्याला नाहक अदा करावे लागत आहे. आता तर समान पाणीपुरवठा योजनेची निविदा रद्द झाली असून पुन्हा नव्याने प्रक्रिया होणार आहे त्यासाठी सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे त्याचा हिशोब केला तर सुमारे साडेचार कोटी रुपये व्याजापोटी द्यावे लागणार आहे. ही , करदात्या पुणेकरांच्या रकमेची उधळपट्टी आहे. कर्ज बँकेकडे तात्काळ परत करण्यासंदर्भात प्रशासनाकडे आधीपासूनच सतत पाठपुरावा केलेला आहे. काँग्रेससह अन्य पक्षांनी या कर्जरोख्यांना विरोध केला पण एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पुणे महापालिका गहाण ठेवण्यास परवानगी दिली, त्यामागे पुणेकरांना समान पाणी पुरवठा व्हावा हा उद्देश होता. असे असतानाही आम्ही व्याजाचा नाहक भुर्दंड करदात्या पुणेकरांवर बसू देणार नाही ही भूमिकाही याअगोदरच स्पष्ट केलेली आहे .असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले.