पुणे: सीबीएससी बोर्डाची पुणे महापालिकेची पहिली शाळा ठरलेल्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलने १०० टक्के निकालाची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम राखली असून या शाळेतील प्रथमेश इंगळे हा विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत आला आहे.
या कामगिरीबद्दल माजी उपमहापौर आबा बागुल यांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळाल्याने त्यांच्यातील गुणवत्तेला वाव मिळत आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्येही ते सरस कामगिरी करून दाखवीत आहेत. ही दूरदृष्टी दाखविल्याबद्दल माजी उपमहापौर आबा बागुल यांचेही समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

