पुणे ;
जीवनाचा भूतकाळ ज्यांनी आपणां सर्वांसाठी अर्पण केला ,त्यातून आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सावरला असे ज्येष्ठ नागरिक हे समाजाला दिशादर्शकच असून आजच्या तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मित्रत्वाची भूमिका बजवावी असे प्रतिपादन काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचे प्रभाग क्रमांक ३५ [सहकारनगर -पद्मावती ] उमेदवार व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले.
संभाजीनगर येथे काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आघाडीचे उमेदवार मेघा भिसे , अश्विनी कदम , सुभाष जगताप यांच्यासह सतीश पवार , प्रकाश आरणे , संतोष गिळे ,संयोजक अमित बागुल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला ज्येष्ठ नागरिकांची अभूतपूर्व गर्दी होती.
आबा बागुल म्हणाले, आई -वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आजच्या तरुणाईने याचा अवलंब केल्यास त्यांना जीवनात निश्चित यश, शांती लाभेल यात कोणतीही शंका नाही. ज्येष्ठ नागरिक हे समाजाला दिशा देणारे एकप्रकारे होकायंत्र आहे.अनुभवाचे बोल , संस्काराची शिदोरी ही या ज्येष्ठांमुळेच नव्या पिढीला मिळते. एकप्रकारे ज्येष्ठ नागरिक हे आपणासाठी सदैव दिशादर्शकच आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांनी आजची युवा पिढी भरकटू नये यासाठी मित्रत्वाची भूमिका बजवावी अशी अपेक्षा आबा बागुल यांनी व्यक्त करताच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनीही उस्फुर्तपणे सहमती दर्शविली.