पुणे- शहरात शहरी गरीब योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकरिता २ लाख रुपये अनुदान गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचाराकरिता वर्षाखेरीज पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील पॅनेलवर असलेल्या वेगवेगळ्या रुग्णालयांना दिले जाते. यामध्ये रुगणांना उपचार, सर्व प्रकारच्या तपासण्या व औषधे यांवर होणारा खर्च रुपये २ लाख पर्यंत किंवा येणाऱ्या बिलाच्या ५० % रक्कम रुग्नालयांना अदा करण्यात येते. परंतु रुग्णालयांतर्फे या बिलामध्ये औषधांची किंमत विदेशी औषधे वापरून वाढवण्यात येते परिणामी बिलावर त्याचा परिणाम होऊन बिलाची रक्कम वाढते त्याऐवजी जेनेरिक औषधे वापरल्यास बिल कमी येईल व ते रुग्णांना परवडण्यासारखे असेल. रुग्णालयाच्या बिलामध्ये उपचारापेक्षा विदेशी औषधाचेच बिल जास्त असते . याबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी आपल्या खात्याकडे केल्या असून त्यासंबंधात योग्यत्या उपाय योजना करण्याचे आपणांस सांगण्यात आले परंतु या रुग्णालयांवर अद्याप जेनेरिक औषधे वापरण्याबाबत कोणतेही बंधन घातलेले दिसून येत नसून खात्यामार्फत टाळाटाळ करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे हि नागरिकांची व पुणे महानगरपालिकेची सर्रास लूट सुरु आहे.आपण याबाबत सकारात्मक पावले उचलून हि लूट थांबवावी हि कळकळीची विनंती पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाला केली .
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावी याकरिता प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना सर्व भारतभर लागू केली. व सरकारी तसेच सरकारी अनुदानावर चालणाऱ्या व सरकारी फायदे घेणाऱ्या सर्व रुग्णालयांनी प्रथम रुग्णांना जेनेरिक औषधे देणे बंधनकारक आहे. याची अंमलबाजवणी होणे गरजेचे आहे. असेही आबा बागुल म्हणाले
आबा बागुल म्हणाले कि , शहरी गरीब योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रती वर्षी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद केली जाते. सर्वसाधारण १६ ते १८ हजार रुग्णांवर यामार्फत उपचार केले जातात याची संख्या वाढवण्यासाठी विदेशी औषधांचा वापर कमी करून जेनेरिक औषधांचा जास्तीत जास्त वापर केल्यास रुग्ण लाभार्थींची संख्या तिपटीने वाढेल म्हणजेच अंदाजे ५० हजार रुग्णांना हि सुविधा मिळू शकेल . जेनेरिक औषधे वापरणे कायद्याने बंधनकारक असताना त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शहरी गरीब योजने अंतर्गत गरिबांना जाणीवपूर्वक विदेशी औषधे वापरून लूट करण्यात येत आहे. जेनेरिक औषधे व विदेशी औषधांचा गुणधर्म एकच असून फक्त पैसे मिळवण्याच्या हेतूने रुग्णालये विदेशी औषधांची मागणी करतात. रुग्णाने जेनेरिक औषधांची मागणी केल्यास त्याला अधिक घाबरवले जाते व या औषधाने काही झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही तुम्ही आमच्या रुग्णालयाच्या मेडिकल मधून औषधे घ्या असे बंधनकारक केले जाते. हि बाबा पूर्णपणे बेकायदेशीर असून पुणे शहरातील सर्व रुग्णालयात जेनेरिक औषधांबाबत जनजागृतीचे बोर्ड लावणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून आयुक्तांनी नागरिकांची होणारी लूट थांबवावी व रुग्णालयांना जेनेरिक औषधांचा वापर करण्याची सक्ती करावी अन्यथा या नागरिकांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर आणू नये. असा इशारा आबा बागुल यांनी प्रशासनाला दिला.

