पुणे
पुणे शहराचा वाहतुकीचा जटील बनलेला प्रश्न आता ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटमुळे संपुष्टात येणार असून येत्या जूनमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मात्र त्यासाठी कालमर्यादा निर्धारित करून या प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी केली आहे. तसेच सलग १२ वर्षे या प्रकल्पासाठी काँग्रेस पक्षातर्फे केलेला पाठपुरावा आता सत्कारणी लागल्याचेही नमूद केले आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, १९८७ च्या आराखड्यात काँग्रेसने भविष्यातील वाहुकीचा विचार करून या नियोजित प्रकल्पासाठी आखणी केली. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडला. त्यामुळे २००७ मध्ये पालिकेत विरोधीनेता पदाच्या माध्यमातून हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तेंव्हापासून सलग १२ वर्षे पुणे महानगरपालिका , राज्यसरकार व केंद्रसरकारकडे शेकडो पत्रे , निवेदने , प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठपुरावा करीत आलो. या प्रकल्पासाठी वनविभाग व केंद्रसरकारच्या तसेच काही खासगी जमिनींचे भूसंपादन पाहता दिरंगाई निर्माण झाली . त्यामुळे त्या- त्या विभागांकडे पाठपुरावा करीत राहिलो. गांधीगिरीच्या माध्यमातून रोज एक पत्र आणि गुलाबाचे फुल देऊन या प्रकल्पाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहताना या प्रकल्पाचे भूसंपादन, संपूर्ण आराखडा, सल्लागार नियुक्तीसह आर्थिक तरतूदसाठी विविध पर्याय सुचवून हा प्रकल्प मार्गी लावला, असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षातर्फे गेले बारा वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जीवघेण्या वाहतुकीबरोबरच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग [ रिंग रोड ] महत्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या जूनमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन निश्चित केल्याने आता या प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे ; मात्र केवळ भूमिपूजन नाही तर या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी कालमर्यादा निश्चित करून अंमलबजावणी झाल्यास पुण्याचा जटिल बनलेला वाहतूक प्रश्न जलदगतीने सुटेल असा विश्वासही आबा बागुल यांनी व्यक्त केला.

