तालायनतर्फे पं.किशन महाराज महोत्सवाची उत्साहात सुरुवात
पुणे. ४: मंत्रमुग्ध करणाऱ्या तबल्याचा निनाद आणि गोड गळ्यातून सादर झालेल्या घरंदाज गायकीचा अनुभव नुकताच पुणेकर रसिकांनी घेतला. ताल आणि सुराच्या रंगलेल्या या मैफिलीतून पुणेकर रसिकांना अभिजात कलेचे दर्शन घडले.
निमित्त होते प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कलच्या वतीने झालेल्या पद्मविभूषण पंडित किशन महाराज जन्मशताब्दी सोहळ्याचे’. कोथरूड येथील भारती विद्यापीठात रंगलेल्या या कार्यक्रमात पं. अरविंदकुमार आझाद यांचे ज्येष्ठ शिष्य अनिरुद्ध देशपांडे यांचे तबला वादन आणि अहमदाबाद येथील ज्येष्ठ गायक पद्मविभूषण पं. राजन-साजन मिश्रा यांच्या ज्येष्ठ शिष्या गायिका डॉ. विराज अमर यांनी गायन सादरीकरण करून रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
पंडित किशन महाराज जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने या कलाकारांनी आपली कला सादर करत पहिले पुष्प अर्पित केले. वादन आणि गायनातून या दोन्ही कलाकारांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली.यावेळी संगीत नाटक अकॅडमीचे संचालक शेखर सेन, ज्येष्ठ गायक विकास कशाळकर, भारती विद्यापीठाचे संचालक व संगीत विभाग प्रमुख शारंगधर साठे, सुनील भांडीवाल, गायिका प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील, आरती अंकलीकर-टिकेकर, कार्यक्रमाचे आयोजक अरविंदकुमार आझाद, अनुपमा आझाद आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिरुद्ध देशपांडे यांनी तबला वादनातून या महोत्सवाची सुरुवात केली. परंपरेनुसार उठान, अवचार, तिश्रजाती कायदा, गत, बाट, चक्रधार, फर्द अशा विविध प्रकारच्या तबला वादनातून त्यांनी बनारस घराण्याची परंपरा उलगडली. त्यांच्या सुरेल वादनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. माधव लिमये (संवादिनी) यांनी समर्पक साथ दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायिका डॉ. विराज अमर यांनी पहिला राग श्याम कल्याण विलंबित रुपक द्रुततालात सादर केला. एक ताल, अर्धा ताल ‘जियो मेरे लाल’ ही बंदीश आणि ‘ऐसे तुम्ही को जानत नहीं’ ही रचना सादर केली. बंदिश ब्रम्ह को संगीत रुप मान गुणीजन सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. ‘राग चारुकेसीतील “धर ध्यान गुरु चरण” सादर करून त्यांनी मैफलीची सुरेल सांगता केली. त्यांना सौरभ गुळवणी (तबला), माधव लिमये (संवादिनी) तसेच रश्मी भोसेकर यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालनाची बाजू डॉ सुनील देवधर यांनी उत्तम सांभाळली.
दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत वर्षभर रंगणार जन्मशताब्दी महोत्सव
पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त करण्यात वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. प्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया, जगविख्यात गायिका आश्विनी भिडे-देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती, ख्यातनाम तबलावादक सुखविंदर सिंह नामधारी, पं. स्वपन चौधरी आणि अनिंदो चटर्जी आदी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचा प्रत्यक्ष अनुभव रसिक पुणेकरांना घेता येईल. अशी माहिती अरविंद कुमार आझाद यांनी यावेळी दिली.