पुणे-
इटावा घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांचे सुपुत्र आणि शिष्य उस्ताद शाकीर खान
यांचे स्वतंत्र सतारवादन आणि आणि पं. भास्करबुवा बखले परंपरेतील पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे शिष्य
आणि सुपुत्र पं.तेजस उपाध्ये यांचे स्वतंत्र व्हायोलीनवादन तसेच सतार आणि व्हालोयीन यांची जुगलबंदी अशी
पर्वणी 34 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पुणेकर रसिकांनी अनुभवली.
प्रारंभी पं. तेजस उपाध्ये यांनी चारुकेशी रागात विलंबित रूपक मध्ये बंदिश त्यानंतर द्रुत त्रिताल पेश करत
सर्व रसिकांना जागीच खिळवून ठेवले. तसेच उस्ताद शाकीर खान यांनी बागेश्री रागात आलाप-जोड तसेच
विलंबित झपतालात बंदिश त्यानंतर मध्यलय एकतालातील रचना आणि त्यानंतर द्रुत त्रितालातील रचना पेश
करून सर्व उपस्थितांची वाहवा मिळवली.
मैफलीची सांगता सतार आणि व्हायोलीनच्या जुगलबंदीने मिश्र काफी या रागात झाली .त्यावेळी सभागृहात
अतिशय उत्तम वातावरण निर्मिती झाली . रसिकांनी जणू परब्रह्माची अनुभूतीच अनुभवली .यावेळी पंजाब
घराण्याचे पं.योगेश समसी यांचे शिष्य आघाडीचे युवा तबलावादक पं. यशवंत वैष्णव यांच्या खुमासदार तबला
साथसंगतीने मैफलीस चारचांद लावले.
यावेळी सह्याद्री हॉस्पिटलचे न्युरो आणि स्पाईन सर्जन डॉ जयदेव पंचवाघ यांच्या हस्ते उस्ताद शाकीर खान
यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल व मुख्यसंयोजक डॉ सतीश
देसाई यांच्या हस्ते पं. तेजस उपाध्ये आणि पं.यशवंत वैष्णव यांचे सत्कार करण्यात आले . याप्रसंगी काका
धर्मावत ,मोहन टिल्लू आणि अतुल गोंजारी हे उपस्थितीत होते.या मैफलीचे प्रायोजक जयराज ग्रुप ,आहुरा
आणि न्यती हे होते.