मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्यातर्फे कोझिकोड एअर इंडिया एक्स्प्रेस विमान दुर्घटनेतील मृत राजीवन यांच्या कन्येस विवाहानिमित्त एक लाख रुपये विशेष भेट
· दातार यांनी दिली अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत
मुंबई – केरळमधील कोकालुर (जिल्हा – कोझिकोड) येथील रहिवासी चेरिक्का परंबिल राजीवन (वय ६१) हे गेल्या ७ ऑगस्ट २०२० रोजी दुबईहून विमानाने भारतात येत होते. दुबईतील एका कार वर्कशॉपमध्ये गेल्या २० वर्षांपासून स्प्रे पेंटर म्हणून काम करत असलेले राजीवन त्यांची मुलगी अनुश्री हिच्या आगामी विवाह सोहळ्याची तयारी करण्यासाठी गावाकडे परत येत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ते प्रवास करत असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाला कोझिकोड विमानतळावर उतरताना झालेल्या अपघातात वैमानिक व सहवैमानिकासह २० प्रवाशांचा मृत्यू झाला. राजीवन हे त्या दुर्दैवी बळींपैकी एक ठरले. राजीवन यांचे कुटुंबीय दुःखात बुडाले आणि अनुश्रीसाठी तर हा मोठाच धक्का होता कारण विवाहासाठी आशीर्वाद द्यायला तिचे वडील या जगात नव्हते. पण या दुःखावर फुंकर घालणारी एक घटना घडली. दुबईस्थित मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या मुलीला विवाहासाठी एक लाख रुपये विशेष भेट दिले आणि तिच्यासाठी विवाहाचा क्षण अविस्मरणीय ठरला.

हा विमान अपघात झाल्यानंतर लगेचच अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. धनंजय दातार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना व्यक्तीगत निधीतून सहानुभूतीपूर्वक २० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली व ती काही दिवसांतच संबंधित कुटुंबाच्या खात्यात हस्तांतर झाली. या सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन कारीपूर नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि एक झूम मीटिंग घेऊन त्यामध्ये डॉ. दातार यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. या बैठकीत दिवंगत राजीवन यांच्या आठवणीने त्यांच्या पत्नी निशी यांच्या अश्रूचा बांध फुटला. अनुश्रीच्या साखरपुडा समारंभात राजीवन उत्साहाने सहभागी झाले होते पण विवाहासाठी मात्र ते राहिले नव्हते. त्यांच्या मृत्यूमुळे अनुश्रीचा विवाह लांबणीवर पडला होता. अशा वेळी दातार यांनी केलेली आर्थिक मदत समयोचित ठरल्याचे निशी यांनी बोलून दाखवले.
अनुश्रीच्या विवाहाबाबत समजताच डॉ. दातार यांनी त्याच बैठकीत तिच्यासाठी आणखी एक लाख रुपये खास विवाहभेट म्हणून जाहीर केले व त्वरीत ती रक्कम हस्तांतरही केली. दिवंगत राजीवन यांच्या कुटुंबाने त्यातून अनुश्रीसाठी जास्तीचे सुवर्णालंकार खरेदी केले आणि घराची दुरुस्तीही करुन घेतली. नुकताच हा विवाह सोहळा करोना साथीच्या नियमांचे पालन करत मोजक्या ४० नातलगांच्या उपस्थितीत संपन्न झाला. डॉ. दातार यांच्या सहृदयतेने भारावून गेलेल्या राजीवन कुटूंबाने साश्रू नयनांनी त्यांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार विनयपूर्वक म्हणाले, “मी काही फार महान काम केलेले नाही. विमान अपघातातील बळींच्या कुटूंबांवरील आर्थिक दडपण दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला इतकंच. आपल्याकडून शक्य होईल तेवढे समाजाला देणे द्यावे आणि गरजूंना मदत करुन त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणावे, अशी शिकवण माझ्या आई-बाबांनी मला दिली. मी त्याच संस्कारांच्या वाटेवर चालत आहे. सध्या मी व माझी कंपनी आखातात अडकलेल्या रोजगारवंचित भारतीय कामगारांना मायदेशात सुखरुप पाठवण्यासाठी काम करत आहोत. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक निर्धन भारतीयांना आम्ही विमान प्रवास, वैद्यकीय चाचण्या व वाहतूक-खानपान यांचा संपूर्ण खर्च सोसून घरी पोचवले आहे. कुटुंबासमवेत एकत्र आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद ही माझ्यासाठी सर्वाधिक समाधानाची गोष्ट आहे.”

