पुणे : आयुष्याच्या वाटेवर क्षणाक्षणाला जाणविणा-या अंधाराला पणतीच्या तेजोमय प्रकाशाने आम्ही प्रकाशमान करीत आहोत… तुम्हीही आमच्यासोबत सहभागी व्हा आणि आपल्या आयुष्यात आनंद, ज्ञान आणि उत्साहाची ज्योत पेटवा, असा संदेश देत प्रा फाऊंडेशनमधील दिव्यांग मुला-मुलींनी ५,५५५ पणत्या रंगविण्याचे शिवधनुष्य उचलले. या अनोख्या उपक्रमाला पुणेकरांनी देखील साथ दिली आणि सलग २१ तास ५ हजारहून अधिक पणत्या रंगवून दिव्यांगांनी दिव्यार्पण मॅरेथॉनमध्ये विक्रमी भरारी घेत आनंदोत्सव साजरा केला.
निमित्त होते, प्रा फाऊंडेशन, अनादी…एक विचार आणि भारतमाता महिला मंडळ ट्रस्टतर्फे पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिका येथे आयोजित ५,५५५ पणत्या रंगवित आयोजिलेल्या दिव्यार्पण मॅरेथॉनचे. शनिवारी रात्री ८ वाजता पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करुन मॅरेथॉनचे उद््घाटन झाले. यावेळी उपक्रमाच्या मुख्य संकल्पक प्रा फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.प्राजक्ता कोळकर, निशिगंधा कल्लेद, विदुला वढवेकर, प्रियांका शेंडगे-शिंदे, राजाभाऊ शेंडगे, राघव नाफडे, ओंकार साबणे, सायली खळदकर, श्रद्धा पोंक्षे आदी उपस्थित होते.
शनिवारी रात्री सुरु झालेल्या पणत्या रंगविण्याच्या उपक्रमात एका वेळेस २० जण याप्रमाणे अनेक उत्साही नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. रविवारी, दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ३ हजारहून अधिक पणत्या रंगवून पूर्ण झाल्या होत्या. यामध्ये प्रत्यक्षपणे ७५ दिव्यांग मुला-मुलींनी देखील उत्साहाने सहभाग घेत पणत्या रंगविल्या. सायंकाळी ५ वाजता उपक्रम पूर्ण झाल्यानंतर एका धावपटूने मशाल हाती घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे जाऊन गणरायाला नमन करीत पणत्या अर्पण केल्या. यावेळी दिव्यांग अवंती क्षीरसागर या मुलीने मंदिराबाहेर पणत्या प्रज्वलित केल्या.
डॉ.प्राजक्ता कोळपकर म्हणाल्या, प्रा फाऊंडेशनच्या दिव्यांग मुला-मुलींनी यंदाच्या दिवाळीपूर्वी २ लाख पणत्या विक्री करण्याचा संकल्प केला आहे. त्या मोहिमेमध्ये दिव्यार्पण मॅरेथॉन हा यशाचे छोटे शिखर पार करीत सर्वांना आनंद देणारा उपक्रम आहे. प्रा फाऊंडेशनमधील दिव्यांग मुलांची ऊर्जा कायम रहावी आणि त्यांनी २ लाख पणत्या विक्री मोहिम पूर्ण करावी, याकरीता सामान्य नागरिक, संस्था, संघटना यांनी मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उपक्रमाविषयी माहिती व सहभागाकरीता ९८८१९०७२४१ या क्रमांकावर संपर्क साधून दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

