आज दिवसभर मुख्यमंत्र्यांचे दहीहंडी पर्यटन, उत्सव भेटीच्या माध्यमातून पालिका निवडणुकीचे शक्तीप्रदर्शन
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ,’ मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडू ,मलई जनतेला देवू
मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरसह हजारो गोविंदा उपस्थित होते.

“दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खूप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही ५० थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं काहीही कारण नाही” असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, त्यांनी गोविंदासाठी जाहीर केलेल्या विविध घोषणांची माहिती दिली. तसेच मागील अडीच वर्षांपासून राज्यात कोविड निर्बंधामुळे दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही. पण यावेळी कोणतेही निर्बंध लावले नाहीत. गणपती उत्सवदेखील अशाच जल्लोषात साजरा करायचा आहे, सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण कोविडचं संकट अद्याप गेलं नाही. कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळली तर त्वरित तपासणी करा, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले गेले आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी मेगा दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात लाखोंची बक्षिसे ही पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांचा मोठा उत्साह या उत्सवाच्या आयोजनात दिसत आहे. विशेषतः महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता नेतेमंडळी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करतांना बघायला मिळत आहेत.