पुणे-‘दादरा व नगर हवेली मुक्तिसंग्रामात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांची संघर्षगाथा मांडणारं स्मारक केंद्र सरकारने विकसित करण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. मागील सरकारांनी या स्वातंत्र्यलढ्याकडे दुर्लक्ष केले होते मात्र या मोदी सरकारच्या काळात भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान होतो हे या निर्णयातून आणखी एकदा अधोरेखित झाले आहे. या स्मारकाच्या निर्मितीसाठी स्व. बाबासाहेब पुरंदरे तसेच स्व. लता मंगेशकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे या स्मारकाची निर्मिती म्हणजे त्यांना देखील मानवंदना ठरेल’ असे येथे आज पत्रकार परिषदेतून खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
या स्वातंत्र्यलढ्याला तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला एकप्रकारे आदरांजली देण्यासाठी सिल्वासा सेंट्रल पार्क भागात हे स्वतंत्रता स्मारक विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दादरा नगर हवेली मुक्तिसंग्राम संघर्ष समिती, पुणे यांचे खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या माध्यमातून ह्या स्मारकाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू होते. या मागणीस मंजूर करून, केंद्र सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना आनंदाची बातमी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे कर्तव्य केंद्र सरकार विविध उपक्रमांच्या माध्यमातून बजावते आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारद्वारे एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांच्या मुक्तिसंग्रामात सहभागी असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना तसेच त्यांच्या संघर्षगाथेला योग्य सन्मान देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सिल्वासा स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एक भव्य स्वतंत्रता स्मारक विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. दादरा व नगर हवेली मुक्ती संग्रामाच्या तीन महत्वाच्या घटनांना अर्पित तीन भव्य विजय स्तंभ या स्मारकस्थळात उभारण्यात येतील व त्याद्वारे या अनोख्या मुक्तीसंग्रामात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात येईल.
दादरा आणि नगर हवेलीचा किनारी प्रदेश अनुक्रमे १७८३ आणि १७८५ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. त्यानंतर अप्पासाहेब करमळकर विश्वनाथ लवांडे, प्रभाकर सिनारी, दत्तात्रेय देशपांडे यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि राजा वाकणकर आणि नाना काजरेकर यांसारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचनी पोर्तुगीजांच्या विरोधात अथक संघर्ष उभा करत १९५४ साली या प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवून दिले व पुढे १९६१ मध्ये त्यांचे भारतात विलीनीकरण पूर्ण झाले.
मुक्ती संग्राम पदाधिकाऱ्यांचा सन्मान
दादरा नागर हवेली मुक्ती संग्राम समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, सचिव अरविंद मनोलकर, खजिनदार वसंत प्रसादे यांचा खासदार सहस्रबुध्दे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस राजेश येनपुरे, उपाध्यक्ष धनंजय जाधव, कोषाध्यक्ष विनायक आंबेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर, सह प्रसिध्दी प्रमुख हेमंत लेले यांची प्रमुख उपस्थिती होती.

