पुणे- शहरातील नायडू हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी असल्याने कोरोना झालेल्या रुग्णांनाच्या नातेवाईकांना बेड शेजारी बसवले जाते त्यांची काळजी घेण्यास सांगितले जाते. ही बाब खूप चिंताजनक असून महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे शहरात कोरोना बळावतो आहे असा आरोप पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सत्ताधारी भाजप व प्रशासनाला विचारला.
ते म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य आजार असून त्यापासून इतरांना लागण होते.आधीच पुणे शहरात कोरोनाने थैमान घातले असून ते कमी कसे करायचे याकडे लक्ष देणे गरजेचे असताना महानगरपालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बेड शेजारी बसवून त्यांची काळजी घेण्यास सांगितले जाते, सर्रास नातेवाईक रुग्णांजवळ बसतात, उरीनल व इतर सर्व सफाई नातेवाईकांना करायला लावतात ही अतिशय गंभीर बाब असून नातेवाईक याबाबत तक्रार करत आहेत. सत्ताधारी भाजप नुसतेच निविदेच्या मागे लागले असून हॉस्पिटलमध्ये पाहणीसाठी जातात त्यावेळी त्यांना हे दिसत नाही का? का दिसून देखील दुर्लक्ष करत आहेत. ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही का? यामुळे पुणे शहरात कोरोना वाढेल याची सत्ताधारी भाजपला काळजी नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे नाहक पुणेकरांनी त्रास का सहन करायचा. महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ही अवस्था असेल तर खासगी हॉस्पिटलमध्ये काय असेल. याबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले असून ही परिस्थिती बदलावी नवीन स्टाफ भरती करावी व जातीने लक्ष घालावे अशी मागणी आबा बागुल यांनी केली. व नागरिकांनी असे प्रकार होत असल्यास आमच्याशी व प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन आबा बागुल यांनी केले.

