पुणे : पुण्यातून युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेले ७७ विद्यार्थी तेथील युद्धजन्य स्थितीमुळे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जारी केलेल्या या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील दोन आणि मुंबईतील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
याशिवाय, पुण्यातील आणखी काही विद्यार्थी युक्रेनमध्ये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत असून, त्यांच्याशी संपर्कात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमधील किव्ह, खार्किव, विनितसिया, बोकोवेलियंट, हरिकिया, ओडिसा, कार्नोबिन, टार्नोपिया, युवान, झापोरोझ्ये, बुकोव्हिनियन मेडिकल युनिव्हर्सिटीसह विविध प्रांतामध्ये आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. त्याठिकाणी शून्य ते एक डिग्री सेल्सिअस तापमान तर दुसरीकडे युद्धजन्य स्थिती अशा संकटात विद्यार्थी अडकून पडले आहेत.
किव्ह ही युक्रेनची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. तर, खार्किव हे युक्रेनच्या ईशान्येकडील सर्वात मोठे शहर असून, प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे.
पुणे जिल्ह्यातील या भागातील आहेत विद्यार्थी
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोथरूड, बाणेर, हडपसर, चंदननगर, ससाणेनगर, सोपानबाग, केसनंद, केशवनगर, वाघोली, लोणीकंद, वानवडी, खेड, पुरंदर, थेऊर, शिरूर घोडनदी, शिरूर गुजरमळा, केडगाव, दौंड, पाषाण, बोराटे आळी मुळशी, वडगाव बुद्रूक, बालेवाडी, मुंढवा, जुनी सांगवी, इंदापूर, शिवापूर, जुन्नर, मावळ, लोहगाव, डुडुळगाव, आळंदी रस्ता, उरुळी देवाची, नारायणगाव, लोणावळा, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी चिंचवड, देहू रस्ता, आंबेगाव बुद्रूक, चाकण, लोणावळा, शिक्रापूर परिसरातील आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या यादीमध्ये पुणे जिल्ह्याव्यतिरिक्त वाटेगाव-सांगली येथील दोन आणि मुंबई येथील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन हे केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्कात आहे. संबंधित विद्यार्थ्यांची यादी राज्य सरकारला पाठविण्यात आली आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

