नवी दिल्ली-नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडीकडून चौकशी सुरु आहे. सध्या त्या लंचसाठी ED कार्यालयातून बाहेर पडल्या आहेत.ईडीने यासाठी 50 प्रश्नांची यादी तयार केली आहे. . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची महिला अधिकारी मोनिका शर्मा यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. त्या ईडी कार्यालयात अतिरिक्त संचालक पदावर आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळपासून याविरोधात आक्रमक आंदोलन करत आहेत.चौकशीला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या 75 खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पी. चिदंबरम, शशी थरूर, अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे,यांचा समावेश आहे. याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) आज (२१ जुलै) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी होत आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहे.

ताब्यात घेतल्यानंतर सचिन पायलट म्हणाले- ‘आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत. लोकशाहीत यंत्रणेचा गैरवापर होत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही अहिंसक आंदोलन करत आहोत, तो आमचा हक्क आहे. आमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान सोनिया गांधींची तब्येत बिघडली तर त्यांना परत जाण्याची परवानगी दिली जाईल. त्यांच्यासाठी दुसऱ्या खोलीत वैद्यकीय अधिकारी बसविण्यात येणार आहे. यावेळी प्रियांका गांधीही उपस्थित राहणार आहेत. सोनियांच्या वकिलाला चौकशीदरम्यान उपस्थित राहू दिले जाणार नाही.

नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीने यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. ईडीने त्यांची तब्बल 40 तास चौकशी केली. आज सोनिया गांधी हजर होतील. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना तपासात सहभागी व्हावे लागल्याचे प्रथमच घडत आहे.

