पुणे – येथील सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर सुधारणेसाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून ५०लाखाचा निधी मिळावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ असलेल्या श्री सद्गुरु जंगली महाराज मंदिर याच्या विकासासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीने २०२२-२३ च्या अंदाजपत्रकातून निधी उपलब्ध करावा. मंदिरातील सभामंडप आणि मुख्य प्रवेशद्वार यांचे जतन व्हावे आणि दर्जा वाढावा याकरिता २५लाख आणि दगडी पेव्हिग ब्लॉक करणे, दगडी टप्पा करणे, स्टेनलेस स्टील रेलिंग करणे, मंदिर परिसरात भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे आदी सुविधांसाठी २५लाख असे एकूण ५०लाख रुपये निधीची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जंगली महाराज मंदिर हे पुण्यातील पुरातन ठेवा आहे आणि महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. मंदिरात नित्य धार्मिक कार्यक्रम होत असतात. उत्सवही मोठ्या प्रमाणात होतो. उत्सव काळात गायन, वादन, व्याख्याने असे लोकप्रिय कार्यक्रम होतात. मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून परिसर रमणीय आहे. त्याचे जतन व्हावे अशी अनेक भाविकांची मागणी असल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले

