मुंबई-केंद्रीय वस्तू आणि सेवा कर – सीजीएसटी कार्यालयाच्या दक्षिण विभागाने, सराफा बाजारात सुमारे 1650 कोटी रुपयांची बनावट बिले बनवणाऱ्या बोगस कंपन्यांचे एक जाळे उघडकीस आणले आहे. या कंपन्यानी, 49.7 कोटी रुपयांची बनावट आयटीसी देखील तयार केली होती.या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, मुंबईतील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
अटक करण्यात आलेली व्यक्ती, कर्नाटका ज्वेलर्स, मेसर्स बालाजी एंटरप्राईजेस आणि मेसर्स किस्मत एंटरप्रायझेस यांसारख्या अनेक बनावट कंपन्यांची खोटी बिले तयार करत असे. या तिन्ही बोगस कंपन्यांनी 29.4 कोटी रुपयांची बनावट आयटीसी तयार केल्या आणि दुसरी कंपनी गजमुखी सराफा व्यापाऱ्याला जारीही केल्या. या बनावट आयटीसीचे 29.4 कोटी रुपयांचे बिल, पुढे मेसर्स गोल्डन सराफा व्यापाऱ्याच्या नावाने पाठवण्यात आले. मात्र या सगळ्या व्यवहारात, प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू अथवा माल/सेवांचे व्यवहार झालेच नाहीत. गोल्डन बुलियन (सराफा व्यापारी) ला या आधीच अटक करण्यात आली आहे.
या व्यवहारांच्या सखोल तपासातून असे निष्पन्न झाले की, अटक झालेली व्यक्ती, पैसे मिळवण्यासाठी मुंबई, बेळगाव, बिकानेरसह अनेक ठिकाणांहून अशा बोगस कंपन्यांच्या नावाने खोटे व्यवहार करत होती. या संदर्भात मिळालेले प्रत्यक्ष पुरवले आणि या व्यक्तीने दिलेल्या कबुलीजबाबानंतर, त्याला सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली आहे तसेच, याच कायद्यातील, कलम 132(1)(b), कलम 132(1)(c) आणि कलम 132(5) अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल म्हणजेच 3 फेब्रुवारी 2022 रोजी त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात हजर करण्यात आल्यावर, न्यायाधीशांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या संपूर्ण जाळ्यात सामील असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सीजीएसटी कार्यालयाच्या मुंबई विभागाने सुरु केलेल्या, करचुकवेगिरी विरोधी मोहिमेचा भाग म्हणून ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, सीजीएसटी मुंबई, दक्षिण क्षेत्र कार्यालयाने, आतापर्यंत सुमारे 570 कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस आणली असून, सुमारे 7 कोटी रुपये वसूल केले आहेत, तसंच गेल्या पाच महिन्यांत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.
करचुकवेगिरी करणाऱ्या संभाव्य लोकांचा शोध घेण्यासाठी सीजीएसटी विभाग, डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषणाचा वापर करत आहे तसेच इतर कर अधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवूनही कारचोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. येत्या काही काळात, करचुकवेगिरी विरुद्धची ही मोहीम, विभागातर्फे अधिक तीव्र केली जाणार आहे.