पुणे, दि. १५ जुलै २०२१: हवेली व भोर तालुक्यातील परिसरातील उद्योजक तसेच इतर वीजग्राहकांना दर्जेदार व विनाखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून महानगर क्षेत्र पायाभूत वीजयंत्रणा सक्षमीकरण योजनेतून नवीन ३३ केव्ही डबल सर्कीट वीजवाहिनी उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. सोबतच या परिसरातील वीजयंत्रणेच्या नुतनीकरण व सक्षमीकरणासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे व त्याचेही कामे सुरु आहेत.
मुळशी विभाग अंतर्गत वेळू व खेड शिवापूर परिसरातील औद्योगिक ग्राहकांना खेड शिवापूर ३३/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मात्र ज्या उच्चदाब वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो ती सुमारे २० वर्ष जुनी व अतिभारित आहे. तसेच दऱ्याडोंगरातून व जंगलातून ही वाहिनी जात असल्याने वादळवारा व पावसामुळे या वाहिनीमध्ये बिघाड निर्माण होतो. यावर उपाय म्हणून महावितरणने महानगर क्षेत्र पायाभूत वीजयंत्रणा सक्षमीकरण योजनेतून प्रामुख्याने खेड शिवापूर व वेळू येथील औद्योगिक ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र ३३ केव्ही क्षमतेची नवीन डबल सर्कीट वीजवाहिनी उभारण्याचे काम सुरु केले आहे. या वीज वाहिनीचा काही भाग राष्ट्रीय महामार्गाच्या डक्टमधून नेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाची मंजुरी मिळाली आहे.
यासोबतच खेड शिवापूर उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला आहे. तर या उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही कामथडी उपकेंद्रातील करंट ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात आली आहे. जुने जीर्ण तारा बदलण्यासोबतच लघु व उच्चदाब वाहिन्यांसह वीजयंत्रणेच्या देखभालीचे कामे नियमितपणे सुरु आहेत. यामुळे सद्यस्थितीत पूर्वीच्या तुलनेत वीजपुरवठा अधिक सुरळीत झाला आहे. तसेच उभारण्यात येणारी डबल सर्कीट वीजवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरातील वीजपुरवठ्याचे सर्व प्रश्न संपुष्टात येणार आहेत.
गेल्या १८ महिन्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन तसेच कोविड रुग्णालये व ऑक्सीजन प्रकल्प यामुळे वीजपुरवठा बंद ठेवून जुनाट उच्चदाब वीजवाहिनीच्या देखभाल व दुरुस्ती कामांना मर्यादा आल्या होत्या. ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर देखील महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. सध्या नवीन डबल सर्कीट वीजवाहिनीचे काम वेगात सुरु असले तरी त्यासाठी खांब बसविण्यासाठी काही ठिकाणी स्थानिकांचा विरोध होत असल्यामुळे विलंब होत आहे. त्यावर तोडगा काढत कामे मार्गी लावण्यात येत आहेत. परिसरातील दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या सर्व कामांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

