पुणे- पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक महिन्यांपासून शहराच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुण्यातील वानवडी येथील मिलिटरीचे कमांड हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्या मागणीला यश आले असून मिलिटरीचे कमांड हॉस्पिटलमध्ये ३३० बेड उपलब्ध करण्यात आल्याचे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले.
सद्य स्थितीत शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरात रुग्णांना बेड मिळणे अतिशय कठीण झाले आहे व बेड मिळण्यासाठी पुणेकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोनाच्या काळात बेड संख्या कमी असताना वारंवार शहरातील वानवडी येथील मिलिटरी कमांड हॉस्पिटलचे बेड पुणेकरांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा सुरु होता. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कमांड हॉस्पिटल मधील ३३० बेड मिळाल्यामुळे पुणेकरांना नक्कीच बेडसाठी वणवण कारवी लागणार नाही व दिलासा मिळेल असा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला व या अडचणीच्या काळात ३३० बेड उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रधानमंत्री व मुख्यमंत्री,पुण्याचे आयुक्त व प्रशासनाचे आभार मानले.

