पुणे-
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे संस्थेने आपला २९ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. यासह १९९८ मध्ये पदवी प्राप्त केलेल्या अभियंत्यांच्या पहिल्या तुकडीचा रौप्य महोत्सवही अभिमानाने साजरा केला गेला. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, PVSM, AVSM, VSM, ADC, COAS प्रमुख पाहुणे म्हणून या विशेष प्रसंगी उपस्थित होते.
एआयटीचे संचालक ब्रिगेडियर अभय भट यांनी सर्व मान्यवरांचे, निमंत्रितांचे आणि पुरस्कार विजेत्यांचे स्वागत केले. एआयटीने मागील वर्षात केलेल्या कामगिरीची आणि प्रगतीची झलक दाखवणारा एक संक्षिप्त आढावा त्यांनी सादर केला. यंदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे प्रमाणे एआयटीच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यासह मान्यवर माजी विद्यार्थी आणि फॅकल्टीने मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल विशेष कौतुक केले. तसेच पुढील काही वर्षात एआयटी कशा पद्धतीने प्रगती करणार आहे, याविषयीची माहिती व नियोजन सांगितले.
या प्रसंगी एआयटीतर्फे मानाचा असा ‘जीवनगौरव पुरस्कार’ कल्याणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना प्रदान करण्यात आला. कल्याणी ग्रुपची प्रमुख कंपनी असलेली भारत फोर्ज लिमिटेड ही जगातील मोठी फोर्जिंग कंपनी आहे, जी राष्ट्राच्या आत्मनिर्भर बनण्याच्या प्रयत्नात अमुल्य योगदान देत आहे. तसेच ही कंपनी संरक्षण उपकरणांची निर्यात करणारी महत्वाची कंपनी आहे. प्रगत संरक्षण उपकरणांच्या निर्मितीमागील प्रेरक शक्ती आहेत, त्यांच्या निर्र्यातीत जगातील सर्वात मोठी फायरिंग आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGs), स्वदेशी हेवी क्विक रिअॅक्शन फायटिंग वाहने, दारुगोळा क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणाली यांचा समावेश आहे.
पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांनी सन्मानास उत्तर देताना म्हणाले, भारतीय सशस्त्र दलांचे कर्तृत्व कौतुकास्पद आहे. आज भारतीय संरक्षण उद्योग प्रगत शस्त्र प्रणालीच्या आयातदारांकडून निर्यातदार बनले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था, संरचनात्मक सुधारणा, उत्पादन उत्क्रांती सक्षम करणारे तंत्रज्ञान, “इंडिया फर्स्ट” मुत्सद्देगिरी आणि युवाशक्ती या पाच प्रमुख शक्तींमुळे पुढील दशकात भारत एक राष्ट्र म्हणून जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करेल. २०४७ पर्यंत भारत ३३ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल.
कार्यक्रमात या प्रसगी एआयटीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या शाखेतील पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि कोलॅबरेशन.एआय या वॉशिंग्टन, अमेरिका स्थित कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर मैनी यांना यशस्वी माजी विद्यार्थी युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समीर मैनी म्हणाले, “यशस्वी तरुण माजी विद्यार्थी उद्योजक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मी नम्र आणि कृतज्ञ आहे. आज मी जिथे आहे तिथे पोहोचन्यात आणि माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या जडणघडणीत एआयटीचे खूप योगदान आहे. कॉलेजमध्ये असतानाच्या क्षणांचा आनंद घ्या. प्रत्येक उपक्रमात सहभागी व्हा.”
प्रमुख पाहुणे जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते कार्यक्रमात पुढे गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. चीफ ऑफ आर्मी स्टाफ बेस्ट ऑल राउंडर ट्रॉफी माहिती तंत्रज्ञानाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आकाश भाटी याला देण्यात आली. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी क्रीडा पुरस्कार राजशेखर करंडक संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी भावना निम्मगड्डा हिला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट इनोव्हेशनसाठी राजपूत रेजिमेंट ट्रॉफी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी अभिनव प्रताप चौहान याला देण्यात आली.
सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम संशोधन आणि सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. सागर राणे यांना तर उत्कृष्ट तांत्रिक सहाय्यक कर्मचारी (बेस्ट नॉन-टीचिंग टेक्निकल स्टाफ अवॉर्ड) पुरस्कार स्वाती साळुंखे आणि सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अविनाश भोसले यांना देण्यात आला.
प्रमुख पाहुणे, जनरल मनोज पांडे, PVSM, AVSM, VSM, ADC, COAS, यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि एआयटीच्या पहिल्या बॅचचे २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हनाले की, “मला आनंद वाटतो की, एआयटी २०० सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजच्या यादीमध्ये समाविष्ट झाले असून, गुणवत्तेचा आलेख चढता ठेवला आहे. मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळत स्वतःचे स्टार्टअप सुरु केले असून, आज ते यशश्वीपणे चालवले जात आहेत, याचा आनंद वाटतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, फाईव्ह जी, क्वांटम कम्प्युटिंग या पाच तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. आधुनिक काळातील युद्धावर विघटनकारी रीतीने प्रभाव टाकण्यासाठी संभाव्य लष्करी अनुप्रयोग महत्वाचे ठरत आहेत. स्टार्टअप्स, वैयक्तिक नवोन्मेषक, एमएसएमई, संशोधन आणि विकास संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सक्षमतेचा लाभ घेण्यासाठी इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (आयडीईएक्स) अंतर्गत प्रमुख प्रकल्पांचा पाठपुरावा केला जात आहे. हे भारतीय सैन्याला भविष्यात सज्ज, तंत्रज्ञानाने चालवलेले, प्राणघातक आणि चपळ सैन्यात आकार देण्यासाठी रोडमॅप बनवन्यात उपयोगी ठरत आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संदेशाप्रमाणे “स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, तर ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.” त्याचा आपण सतत विचार केला पाहिजे.”
या कार्यक्रमादरम्यान टाटा, झेडएस असोसिएट, पर्सिस्टंट फाऊंडेशन, होरायझन ग्रुप, बडवे ग्रुप, हॅशमॅप, उडचलो ग्रुप, न्यू इंडियन एक्सप्रेस यांसारख्या संस्थांनी प्रायोजित केलेल्या विविध शिष्यवृत्ती कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.
एआयटीच्या मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन व सदर्न कमांड येथील सीएसओ मेजर जनरल टीएस बेन्स यांनी आभार मानले. यावेळी एआयटीचे जॉईंट डायरेक्टर एम. के. प्रसाद, प्राचार्य बी. पी. पाटील, मेजर जनरल आर. के. रैना, VSM, MD, AWES, अनेक सेवानिवृत्त अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, पालक, माजी विद्यार्थी, एआयटी च्या विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

